त्र्यंबकेश्वर (नाशिक) - गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. भाविकांना भोलेनाथाचे दर्शन झाल्याने आनंदाचे वातावरण पसरले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरच बंद असल्याने भाविक यात्रेकरू त्र्यंबकेश्वरला येत नव्हते. साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त असलेला दिवाळीचा पाडवा, भगवान शिवशंकराचा वार सोमवार अशा दिवशी भगवान त्र्यंबकराजाचे मंदिर उघडल्याने शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असुन नगरवासियांची दिवाळी देखील गोड झाली आहे. देवस्थान ट्रस्टने दर्शनाबाबत एक नियमावली केली आहे. या नियमावलीचा वापर भाविकांनी काटेकोर करावा असे आवाहन देवस्थान विश्वस्त मंडळाने केले आहे. देवस्थान ट्रस्टचे सचिव तथा नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय जाधव यांचे हस्ते पहाटे पाच वाजता भगवान त्र्यंबकेश्वराची महापुजा करण्यात आली. पुजेचे पौरोहित्य श्रीमंत पेशव्यांचे वंशपरंपरागत तिर्थोपाध्ये वेदमुर्ती दिलीप रुईकर व ओंकार रुईकर यांनी केले. बरोबर सकाळी ६ वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. यावेळी विश्वस्त प्रशांत गायधनी, संतोष कदम यांचेसह व्यवस्थापक यादव भांगरे, समीर वैद्य उपस्थित होते.
नाशकात उघडली मंदिरांची दारे
गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली नाशिक मधील मंदिरे तसेच अन्य धार्मिक स्थळे आज भाविकांसाठी खुली झाली आहेत. नाशिककरांचे श्रद्धा स्थान असलेले श्री काळाराम मंदिराचे दरवाजे आज सकाळी सात वाजता उघडण्यात आले. यावेळी असलेल्या भाविकांचे ताप मोजून आणि हॅन्ड सॅनिट्झरने हात स्वच्छ धुतल्यानंतरच प्रवेश दिला जात होता. या शिवाय टप्प्या टप्प्याने भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात असल्याने सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करण्यात आले. या शिवाय शहरातील दर्गा, गुरुद्वारा आणि अन्य धार्मिक स्थळे देखील सुरक्षित अंतराचे पालन करून आज सकाळी सुरू झाले आहेत.
सप्तश्रृंगी मातेच्या मंदिराचे दरवाजे उघडले
कोरोनामुळे बंद असलेली धार्मिक स्थळे आजपासून उघडण्यात आली. साडेतीन पिठपैकी अर्धे पीठ असलेल्या सप्तश्रृंगी मातेच्या काकड़ आरतीचा मान वैभव देवरे व सोनल देवरे परिवार यांना मिळाला. देवीट्रस्टच्या वतीने त्यांना शाल श्रीफळ देण्यात आले. त्यांच्यासोबत चैतन्य देवरे, तेजस्वी देवरे, निखिल पवार, नवीन सोनवणे, राहुल बोराडे, सुरेश धोंगड़े,जीवन आहेर, विक्रम धोंगड़े, श्रीकांत घोंगड़े, संदीप घोंगड़े, दीपक मोहिते,युवराज मोहिते आदि उपस्थित होते.