नाशिक : कोरोना लसीकरणाला जिल्ह्यात हळूहळू वेग येऊ लागला आहे. जिल्ह्यात प्रारंभी कमी असलेल्या लसीकरणाच्या प्रक्रियेत हळूहळू सकारात्मक वाढ होत असून, प्रमाणदेखील वाढू लागले आहे. मात्र, अद्ययावत यंत्रणेमुळे कोरोना लस वाया जाण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
नाशिक शहरातील चार केंद्र, मालेगाव शहर परिसरातील पाच, तसेच कळवण, चांदवड, निफाड आणि येवला उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी पहिल्या दिवसाच्या लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्ह्यात लसीकरणाच्या प्रारंभिक टप्प्यात सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. त्याअंतर्गत नाशिक जिल्ह्यात १३ रुग्णालयांमध्ये लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रारंभीच्या टप्प्यात काहींनी प्रकृतीचे कारण दिले, तर काहींनी पुढील टप्प्यात लस घेणार असल्याचे सांगून पहिल्या दिवशी लस घेण्यास नकार दिला. त्यामुळे लसीकरणाच्या पहिल्या दिवशी केवळ ५७ टक्के लसीकरणाचे लक्ष्य साध्य होऊ शकले. जिल्ह्यातील लसीकरणामध्ये प्रत्येक केंद्रावर काही कर्मचाऱ्यांनी नकार दिला. त्यात कुणी इतर आजाराचे कारण दिले. काही कर्मचाऱ्यांनी ॲलर्जीचे कारण सांगून नकार दिला, तर काही महिला कर्मचाऱ्यांनी मातृत्व आणि गरोदरपणाचे कारण सांगून नकार दिला. राज्य पातळीवरदेखील लसीकरणात पहिल्या दिवशी नाशिकचा क्रमांक २६ वा होता. मात्र, केवळ दहाच्या टप्प्यापेक्षा कमी कर्मचाऱ्यांनी लस घेतली तरच लस वाया जात असल्याने लस वाया जाण्याचे प्रमाण अवघे २९ आहे.
इन्फो
एका बाटलीत १० डोस
कोरोनाच्या लसीच्या एका बाटलीतून दहाजणांना डोस देता येतो. ही बाटली एकदा उघडल्यानंतर सहा तासांत त्यातील सर्व डोस वापरणे आवश्यक असते. त्यामुळे एकामागोमाग कर्मचारी येत गेल्यास दहा डोस पूर्ण झाल्यानंतरच पुढील बाटली उघडली जाते. त्यामुळे केवळ १०च्या टप्प्यापेक्षा कमी कर्मचाऱ्यांनी लस घेतल्यास डोस वाया जातो.
इन्फो
घाबरू नका
राज्यात देण्यात येत असलेल्या कोरोना लसींच्या डोसमध्ये कुठेही फार मोठे दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत. तसेच कोणत्याही कर्मचाऱ्याला रुग्णालयात ॲडमिट करण्याचीदेखील वेळ आली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारे घाबरण्याची आवश्यकता नसल्याचेच सिद्ध झाले आहे.
लहान बाळांनादेखील कोणतीही लस दिली तर थोडीशी रडरड करणे, ताप येणे यासारखे प्रकार घडतात. मग ही तर काेरोनासारख्या आजारावरील लस असल्याने त्यामुळे काहींना थोडेसे डोके जड होणे, हात दुखणे असे प्रकार होऊ लागले तरी ती चिंतेची बाब नसून ती लस योग्य परिणाम करीत असल्याचे दर्शविते.