नाशिक : शहर बस वाहतूकीचा मुद्दा गाजत असून राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने शहरांतर्गत बस वाहतूकीचा खर्च परवडत नसल्याचे सांगत बसफे-यांमध्ये कपात करण्यास सुरूवात केली आहे. याचा सर्वाधिक फटका शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शहरासह ग्रामिण भागात बसत आहे. एकीकडे बसफे-यांमध्ये कपात सुरू असताना दुसरीकडे मात्र शालेय विद्यार्थ्यांना बस प्रवासाचा सवलतीचा पास तयार करून देण्याचा महामंडळाचा कारभार मात्र थांबलेला नाही; यामुळे विद्यार्थ्यांना महामंडळाकडे अगाऊ पैसे भरुनदेखील बस प्रवासासासाठी बसेसची तासन्तास वाट बघावी लागत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. सदर समस्येविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष आदित्य शिरोडकर यांचे नाशिककरांनी लक्ष वेधले. रविवारी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांच्या प्रवेश कार्यक्रमानंतर शिरोडकर यांनी यासंदर्भात मनविसेच्या शहर व जिल्हा कार्यकारर्णीच्या पदाधिका-यांना सुचना देत महामंडळाच्या संबंधित अधिका-यांची भेट घेऊन मनसे स्टाईल महामंडळाची ‘डबल बेल’ वाजवून विद्यार्थ्यांची परवड थांबविण्याचा आदेश दिला आहे.
बस विद्यार्थी वाहतूकीचा प्रश्न बसफे-यांच्या कपातीमुळे ऐरणीवर आला आहे. बसफे-या कमी आणि सवलतीचे पासधारक विद्यार्थी अधिक अशी स्थिती सध्या नाशिकमध्ये उद्भवली आहे. महामंडळ व महापालिका यांच्या वादात विद्यार्थी भरडले जात असून त्यांच्या प्रवासाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. कारण बसेसची संख्या व फे-या कमी झाल्यामुळे मिळेल त्या बसमध्ये विद्यार्थी अक्षरक्ष: दरवाजाबाहेर लटकून प्रवास करत आहेत. त्यामुळे एखाद्या शेळ्या-मेंढ्यांच्या वाहनांमध्ये जसे चित्र बघावयास मिळते तसेच चित्र शाळा-महाविद्यालय सुटण्याच्या व भरण्याच्या वेळी नाशिकमध्ये शहर बसेसमध्ये दिसत आहे. बस प्रवासाच्या सवलतीचा पास काढल्यामुळे विद्यार्थी दुसºया वाहतुकीच्या साधनांचा विचार करत नाही कारण आर्थिकदृष्ट्या त्यांना ते परवडणारे नाही. महामंडळाने ज्या मार्गांवर तोटा आहे त्या मार्गांवरील बसफे-यांची कपात करुन शहरातील शाळा-महाविद्यालयांच्या मार्गांवरील बसफे-या वाढवाव्या तसेच जोपर्यंत बसफे-या मुबलक होत नाही तोपर्यंत बसेसच्या विद्यार्थी वाहतुकीचा सवलतीचा पास नव्याने उपलब्ध करुन देणे बंद करावे, या प्रमुख मागण्यांसाठी मनविसे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिरोडकर यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना दिला.