संजय पाठक, नाशिक : महापालिकेने पाणीपुरवठा विभागाची काही कामे करण्यासाठी आज ड्राय डे घोषित केला असून दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या दरात वाढ झाली असून दुप्पट तिप्पट दराने तेही विहिरीचे पाणी शहरात पुरवले जात आहे.
नाशिक महापालिकेने पावसाळापूर्व कामे करण्यासाठी आज पाणीपुरवठा बंद ठेवला आहे त्याचबरोबर स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने पाण्याचे अचूक अचूक मोजमाप करणारे स्काडा मीटर जलकुंभना बसवण्यात येणार आहे. या कामासाठी आज दिवसभर संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी पाणी जपून ठेवावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले असले तरी अनेक ठिकाणी सोसायट्यांमध्ये पाणी संपल्याने टँकरची मदत घ्यावी लागत आहे.
महापालिकेची नळ बंद असल्यामुळे विहिरीतील पाणी टँकर चालक पुरवत असून या पाण्याच्या दरामध्ये दुप्पट तिप्पट वाढ करण्यात आली आहे. 400 ते 600 रुपयांचे टँकर बाराशे ते चौदाशे रुपये या दराने पुरवले जात आहेत. महापालिकेचे या दरावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.