सिडको : सावकारांकडून घेतलेल्या कर्जवसुलीच्या तगाद्यास कंटाळून पत्नी-पत्नीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि़ १५) दुपारी अंबडमधील केवल पार्क परिसरात घडली़ वासुदेव अंबादास जाधव (३८) व संगीता वासुदेव जाधव (३४, रा़ कमल रेसिडेन्सी, अष्टविनायकनगर, केवल पार्क, अंबड, मूळ रा़ भोरटेक, ता़ शिरपूर, जि़ धुळे) असे आत्महत्या केलेल्या दांपत्याचे नाव आहे़ दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरून पाच सावकारांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अष्टविनायकनगरमधील कमल रेसिडेन्सीमध्ये वासुदेव जाधव व संगीता जाधव हे दांपत्य राहत होते़ लेबर कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय करणाऱ्या वासुदेव जाधव यांनी व्यवसायासाठी संशयित अशोक केदू होळकर, सुनील पूरकर, राहुल जाधव, प्रवीणभाऊ (वेदमंदिर) व अमोल सोनवणे यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. या कर्जाच्या वसुलीसाठी या पाचही सावकारांकडून तगादा सुरू असल्याने जाधव पती-पत्नी तणावात होते़ त्यातच काही दिवसांपूर्वीच वासुदेव जाधव यांचा अपघात झाल्याने ते गंभीर जखमी झाले व घरातील आर्थिक स्थिती बिघडली़ मात्र, यानंतरही सावकारांकडून कर्जाची सातत्याने मागणी सुरूच होती़सावकारांकडून पैशांच्या वसुलीसाठी सुरू असलेल्या शारीरिक व मानसिक छळामुळे कंटाळलेल्या जाधव दांपत्याने सकाळच्या सुमारास राहत्या घरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली़ दुपारी १२ वाजेच्या सुमारास हा प्रकार समोर आला़ या दोघांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांचे आतेभाऊ समाधान पवार यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अंबड पोलिसांना माहिती दिली. अंबड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत असताना त्यांना जाधव यांनी मृत्युपूर्व लिहिलेली चिठ्ठी आढळून आली़ त्यामध्ये या पाच सावकारांकडून घेतलेले कर्ज व त्यासाठीचा तगादा यामुळे आत्महत्या करीत असल्याचे लिहिलेले होते़ अंबड पोलिसांनी या चिठ्ठीवरून संशयित सावकार अशोक केदू होळकर, सुनील पूरकर, राहुल जाधव, प्रवीणभाऊ (वेदमंदिर) व अमोल सोनवणे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़सिडकोसह टक्केवारीचा धंदा जोरातशहरात विविध ठिकाणी त्यात सिडको व अंबड परिसरात अवैध सावकारीला ऊत आला आहे़ महिना वीस ते पंचवीस रुपये दराने सावकार अडलेल्या व्यक्तीस कर्ज देतात़ या कर्जाची वसुली करण्यासाठी गुंड हाताशी धरले जातात. प्रसंगी मारहाण व घरातील सामान उचलून नेण्याचे प्रकार घडतात़ मात्र सावकाराच्या गुंडगिरीला घाबरून कर्जदार पोलिसांकडे जाण्यास तयार होत नाही़ तसेच कर्ज देण्यापूर्वीच सावकार कायदेशीर कागदोपत्री लिखापढी करून कर्जदारास पुरते अडकवून ठेवतात़खोट्या केसेसची धमकीजाधव दांपत्याने या पाच सावकारांकडून सुमारे सात ते आठ लाख रुपये कर्ज घेतले असून, ते वेळोवेळी परत केले होते़ मात्र, तरीही त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकविण्याची तसेच जिवे ठार मारण्याची धमकी संशयितांकडून दिली जात होती़ सततच्या या शारीरिक व मानसिक छळास कंटाळून तणावामुळे आत्महत्या करीत असल्याचे या चिठ्ठीत नमूद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़
सिडकोत कर्जवसुलीच्या तगाद्यास कंटाळून दांपत्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:15 AM