मालेगाव : येथील शासकीय शासकीय विश्रामगृहाच्या आवारातील पूर्वेकडील मोकळ्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासह, राज्य सुरक्षा महामंडळाच्या ४७ कर्मचाऱ्यांना वेतन खर्चाला महासभेने गुरुवारी (दि. २०) मंजुरी दिली.महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त भालचंद्र गोसावी, नगरसचिव श्याम बुरुकुल यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने महासभा झाली. सभेच्या प्रारंभी तांत्रिक अडचणीमुळे गोंधळ उडाला होता. यानंतर विषयपत्रिकेवरील विषयांना सुरुवात झाली. भूसंपादनाचा विषय तहकूब करण्यात आला. मनपा हद्दवाढ भागातील विकास आराखड्याला एक वर्ष मुदतवाढ द्यावी, असा विषय प्रशासनाने महासभेकडे मांडला होता. यावर नगरसेवक अस्लम अन्सारी यांनी आक्षेप घेत या विषयाला किती वेळा मुदतवाढ द्यायची, असा सवाल उपस्थित केला.
यावेळी आयुक्त गोसावी यांनी शासनाकडे वारंवार हा प्रस्ताव पाठवावा लागतो, असे सांगत या विषयाला मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या सुरक्षेसाठी ४७ कर्मचाऱ्यांची राज्य सुरक्षा महामंडळाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी लागणाऱ्या खर्चालाही महासभेने मंजुरी दिली आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा विषय अखेर मार्गी लागला आहे. गेल्या आठवड्यात जमियत उलमा ए मालेगाव व पूर्णाकृती पुतळा उभारणी समितीची बैठक झाली होती. या बैठकीत पुतळ्याची जागा निश्चित करण्यात आली होती. त्याप्रमाणे शासकीय विश्रामगृह आवारातील पूर्वेकडील मोकळ्या जागेत डॉ. आंबेडकर यांचा नियोजित पूर्णाकृती पुतळा उभारण्यास महासभेने मंजुरी दिली आहे तर मोकळा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा विषय तहकूब करण्यात आला आहे.उद्यानांच्या कामांना मंजुरीमहापालिकेच्या दरेगाव शिवारातील सर्व्हे क्रमांक २०१/१ व सर्व्हे २०१/२ येथील खुल्या जागांवर महापालिका फंडातून वाचनालय व इमारत उद्यानाची देखभाल-दुरुस्तीचे काम इस्म फाउंडेशनला देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच मालेगाव शिवारातील सर्व्हे क्रमांक १०१/१ व सर्व्हे क्रमांक १०१/२ येथेही उद्यान व वाचनालय बांधण्यासाठी बिस्मिल्ला एज्युकेशनल ॲण्ड वेल्फेअर सोसायटीला मंजुरी देण्यात आली आहे. भायगाव शिवारातील सर्व्हे क्रमांक २४४/१०० येथे मोकळ्या भूखंडावर सामाजिक व सांस्कृतिक कामासाठी विश्वनिर्माता बहुउद्देशीय संस्थेला जागा देण्याचा विषय मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय, नामकरणाच्या विषयांना महासभेने मंजुरी दिली आहे. चर्चेत नगरसेवक अस्लम अन्सारी, शान ए हिंद, अमीन अन्सारी आदींनी सहभाग घेतला.