नाशिक - प्रख्यात कीर्तनकार आणि जन प्रबोधनासाठी आयुष्य वेचणारे डॉ श्रीकृष्णबुवा सिन्नरकर (भट ) तथा श्रीकृष्णानंद भारती स्वामी यांचे शनिवारी (दि 30) रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. शनिवारी रात्री प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेत असताना प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, एक मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
मूळचे सिन्नर तालुक्यातील रहिवासी असलेल्या डॉ सिन्नरकर यांचे वडील देखिल कीर्तनकार होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून वारसा पुढे नेणाऱ्या बुवांनी 11 हजार कीर्तनाचा विक्रम केला होता. देश विदेशात त्यांचे अनुयायी होते. गुलाब महाराज यांच्यावर संशोधन करून पीएचडी त्यांनी मिळवली होती. प्रखर हिंदुत्ववादी आणि सावरकरवादी असल्याने वेगवेगळ्या कारणावरून त्यांना अनेकदा अटक झाली परन्तु पुढे निर्दोष सुटका झाली होती. 14 जून 2019 मध्ये त्यांनी संन्यास आश्रम स्वीकारला त्यानंतर त्यांनी श्रीकृष्णानंद भारती स्वामी हे नाव धारण केले होते. त्यांची अंत्ययात्रा रविवारी सकाळी सात वाजता पंचवटीतील मेरी येथील निवासस्थानापासून निघेल.