संजय पाठक, नाशिक- धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली त्याला विरोध करत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी आणि काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते मात्र डॉ. शेवाळे यांना राजीनामा देणे महागात पडले असून त्यांचा त्यांच्या जागी प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून चांदवडचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजेच अप्रत्यक्षरीत्या डॉ. तुषार शेवाळे यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य असे तीन विधानसभा मतदार संघ येतात. डॉ. तुषार शेवाळे मालेगावचे असून ते या मतदारसंघात इच्छुक उमेदवार होते मात्र काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निरीक्षक आणि प्रभारी राज्याच्या माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या काही पदाधिकारी राजीनामे दिले होते तर दुसऱ्या दिवशी डॉ. तुषार शेवाळे आणि धुळे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी देखील जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. डॉ. शोभा बच्छाव या आयात उमेदवार असून त्या मतदार संघात चालू शकणार नाही असा डॉ. शेवाळे यांचा दावा होता. तसेच प्रचारासाठी मालेगाव कार्यालयात गेलेल्या काँग्रेस उमेदवार डॉ शोभा बच्छाव यांना डॉ शेवाळे यांच्या समर्थकांनी चले जाव अशा घोषणा देऊन विरोध केला होता.
धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्याम सेनेर यांनी देखील अशाच प्रकारे डॉ बच्छाव यांना उमेदवारी दिल्याने राजीनामा दिला होता. मात्र, काल पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नाशिक मध्ये येऊन शाम सनेर यांच्याशी बंद दारावर चर्चा केली होती मात्र डॉ. शेवाळे यांच्याशी त्यांची चर्चा झाली नव्हती आता थेट माजी आमदार शिरीष कोतवाल यांची प्रभारी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने डॉ. तुषार शेवाळे यांचा राजीनामा पक्षाने मंजूर केल्याचे स्पष्ट झाले आहे.