येवला : येवल्यात टेक्सटाइल इंडस्ट्रीसाठी प्रयत्न करणार असून विणकरांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना, ज्येष्ठ विणकरांसाठी पेन्शन योजना तसेच हेल्थकेयर योजनांसह विणकर कारागिरांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.
शहरातील जैन पॅलेस हॉटेल बेसमेंट हॉलमधे वस्त्र समिती, वस्त्र मंत्रालय, भारत सरकार यांचेवतीने पैठणी विणकरांसाठी हैण्डलूम मार्क योजना आणि मोबाइल ॲपवरील क्लस्टर स्तरावरील जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पवार यांचे हस्ते झाले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. केंद्र सरकारच्या विणकरांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही पवार यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून वस्त्र समितीचे सचिव ए. बी. चव्हाण, संत कबीर पुरस्कार विजेते शांतिलाल भांडगे, तहसीलदार प्रमोद हिले, माजी नगराध्यक्षा उषाताई शिंदे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते रमेशसिंह परदेशी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. वस्त्र समितीच्या के. सी. कौशल यांनी हैंडलूम मार्क योजना व मोबाइल ॲपविषयी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन गणेश खळेकर व श्वेतांबरी राऊत यांनी केले. आभार प्रदर्शन रमेशसिंह परदेशी यांनी केले. कार्यक्रमास विणकर कारागीर मोठ्या संख्येने उपस्थित होते.