मालेगाव : सुरक्षारक्षकाला गंभीर मारहाण; तिजोरीसह इतर साहित्याची तोडफोडमालेगाव : जिल्ह्यात नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेवर दरोडा टाकण्याचे सत्र अद्याप सुरू असल्याचे समोर आले आहे. मालेगाव तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या निमगाव शाखा लुटीपाठोपाठ सोनज येथील भरवस्तीत असलेल्या बॅँक शाखेत सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. दरोडेखोरांनी सुरक्षा रक्षकाला गंभीर मारहाण करीत दोराने बांधून बॅँकेलगतच्या शेतात टाकून दिले होते. सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात ही बाब आली. यानंतर चोरट्यांनी सोनज व सौंदाणे येथील दुकाने फोडली. बॅँकेच्या तिजोरीत आठ लाख एक हजार १८८ रुपयांची रोकड होती.गुरुवारी रात्री हा धाडसी दरोड्याचा प्रयत्न झाला. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँक चोरट्यांच्या रडारवर आहे. तालुक्यातील निमगाव बॅँकेतून सुमारे १३ लाखांची रोकड लंपास झाली होती. आता सोनज बॅँक शाखेच्या मागच्या बाजूची खिडकी कापून रोकड चोरण्याचा अयशस्वी प्रयत्न अज्ञात चोरट्यांकडून करण्यात आला. या बॅँकेच्या सुरक्षेसाठी प्रताप बासू हा सुरक्षा रक्षक कामावर होता. दरोडेखोरांनी त्याला गंभीर मारहाण करीत शेजारील शेतात फेकून दिले व खिडकीचे गज कटरच्या साह्याने तोडून बॅँकेत प्रवेश केला. तिजोरी तोडण्याचाही प्रयत्न केला. बॅँकेत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तोडफोड करण्यात आली. गॅस कटर काम करीत नसल्याने चोरट्यांना तिजोरी फोडता आली नाही. यानंतर चोरट्यांनी बॅँकलगतचे वेल्डिंगचे दुकान व सौंदाणे येथील बाजारपेठेतील दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी १० हजार रुपये किमतीचे डाटा फिडिंग मशीन चोरून नेले आहे.घटनेची माहिती पोलीस उपअधीक्षक अशोक नखाते, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल बडगुजर यांना मिळताच त्यांनी बॅँक शाखेत धाव घेऊन पाहणी केली. तसेच श्वानपथकाकडून चोरट्यांचा माग काढण्यात आला. ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. शाखा व्यवस्थापक एस.के. अहिरे यांनी फिर्याद दिली. तालुका पोलिसात अज्ञात सहा दरोडेखोरांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत. (प्रतिनिधी)
सोनज बॅँक शाखेवर दरोड्याचा प्रयत्न
By admin | Published: September 09, 2016 12:46 AM