नाशिक : नाट्य दिग्दर्शकाचे नाटकासोबतच प्रेयसीवर जडलेले प्रेम आणि या प्रेमातूनच निर्मिती झालेली कलाकृती युवा कलाकारांनी आपल्या अभिनयातून रंगमंचावर साकारली. प्रेमाचा त्रिकोण असलेल्या ‘तो, ती आणि नाटक’ या एकांकिकेने रसिकांची दाद मिळविली. तसेच दररोजच रविवार जगता आला तर...? या प्रश्नाचे युवा कलावंताकडून ‘एव्हरी डे इज संडे’ या एकांकि केतून उत्तर शोधण्याचा प्रयत्नही प्रेक्षकांना चांगला भावला.निमित्त होते, सार्वजनिक वाचनालय नाशिक व परशुराम साईखेडकर नाट्यगृह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प.सा. नाट्ययज्ञाच्या पाचव्या पुष्पाचे. नाट्यसेवा थिएटर्स निर्मित प्रिया जैन लिखित आणि आनंद/कृतार्थ दिग्दर्शित ‘तो, ती आणि नाटक’ व शंतनू चंद्रात्रे लिखित आनंद जाधव दिग्दर्शित ‘एव्हरी डे इज संडे’ या एकांकिकांचे प्रयोग मंगळवारी (दि.२१) परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सादर करण्यात आले. सुरुवातीला तो, ती आणि नाटक ही एकांकिका सादर करण्यात आली. या एकांकि केचे कथानक नाटकावरील दिग्दर्शकाचे प्रेम आणि प्रेयसीवर जडलेल्या प्रेमातून साकारलेले नाटक याभोवती फिरत जाते. या प्रयोगातून कलाकार आशिष चंद्रचुड, तिष्या मुनवर, समृध्दी वाघमारे, प्रतीक विसपुते, विश्वंभर परेवाल, प्रसाद काळे यांनी भूमिका साकारल्या. तसेच ‘एव्हरी डे इज संडे’ या प्रयोगाचे कथानक वैवाहिक आयुष्यात कालांतराने नाते गृहीत धरले जाऊ लागते. आपल्या जीवनात जोडीदाराचे असलेले महत्त्व विसरले जाते जेव्हा हे कळते तेव्हा...? असे या एकांकिकेच्या कथानकाने भावनिकरीत्या प्रेक्षकांना गुंतवून ठेवले. यामध्ये कृतार्थ कंसारा, सतीश वराडे, मंजूषा फणसळकर यांनी भूमिका साकारल्या.
नाटक अन् प्रेयसीच्या प्रेमाची कलाकृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:52 AM