नाशिक : नाटकांना प्रेक्षकांचा लाभणारा अत्यल्प प्रतिसाद आणि हौशी नाट्यसंस्थांनाही न पेलणारा आर्थिक भार यामुळे मराठी रंगभूमी एका संक्रमण अवस्थेतून जात असताना, तरुण आणि कल्पक रंगकर्मींचा समावेश असलेल्या मयूरी थिएटरने नाट्यकलेला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी ‘नाटक प्रेक्षकांच्या दारी...’ हा उपक्रम राबविण्याचा निर्धार केला असून, शहरात जिथे पुरेशी जागा उपलब्ध होईल तिथे दीर्घांकांचे प्रयोग केले जाणार आहेत. त्याची सुरुवात शनिवारी लोकहितवादी मंडळाच्या ज्योति कलश सभागृहापासून झाली.व्यावसायिक नाटकांचा खालावलेला दर्जा, काही चांगल्या नाटकांना मिळणारा अत्यल्प प्रतिसाद आणि स्पर्धांपुरताच दिसणारा हौशी रंगकर्मी यामुळे मराठी रंगभूमी आपल्या अस्तित्वाशी झुंज देत आहे. नाट्यगृहाकडे प्रेक्षकांना खेचून आणण्यासाठी रंगभूमीवर वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग केले जात असले, तरी या प्रयोगांनाही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. यापूर्वी नाशकात प्रयोग परिवाराच्या माध्यमातून अल्पदरातील प्रेक्षक सभासद योजना राबविण्यात आली होती. परंतु आजचा महागाईचा दर लक्षात घेता यासारख्या योजना राबविणे शक्य नाही. मराठी रंगभूमीवरील बरेचसे कलावंतही चित्रपट आणि वाहिन्यांवरील मालिकांमध्ये व्यस्त झाले आहेत. हजाराहून अधिक प्रयोग झालेली नाटके आता रंगभूमीवरून एक्झिट घेत आहेत. एखादे नाटक व्यावसायिक पातळीवर उभे करून ते चालविणे आता सोपे राहिलेले नाही. अशा स्थितीतही मराठी रंगभूमीकडे प्रेक्षकांना पुन्हा एकदा खेचून आणण्यासाठी शहरातील काही धडपडणाऱ्या युवा रंगकर्मींनी नवा प्रयोग राबविण्याचा निर्धार केला आहे. मयुरी थिएटरच्या वतीने ‘नाटक प्रेक्षकांच्या दारी...’ हा उपक्रम राबविला जाणार असून, शहरात जेथे-जेथे ५० ते २०० आसन क्षमतेचे सभागृह, नाट्यगृह, अॅम्पी थिएटर्स असतील तेथे ‘निवडीत अवकाश’ आणि ‘स्टालिन’ या दीर्घांकांचे प्रयोग केले जाणार आहेत. त्यानुसार दि. १३ सप्टेंबरला लोकहितवादी मंडळ, दि. १२ आॅक्टोबर रोजी ऋतुरंग अॅम्पी थिएटर, नाशिकरोड, दि. १३ आॅक्टोबर रोजी कालिदास कलामंदिर, दि. २० आॅक्टोबर रोजी कुसुमाग्रज स्मारक याठिकाणी प्रयोग सादर केले जाणार आहेत. (प्रतिनिधी)
नाशिकमध्ये नाटक प्रेक्षकांच्या दारी...
By admin | Published: September 13, 2014 9:58 PM