नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत दहा महिन्यांपासून ठप्प झालेली रंगभूमी पुन्हा पूर्वीप्रमाणेच बहरावी यासाठी महापालिकेने भाड्यात निम्मी कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता नवीन वर्षात कालिदासचा पडदादेखील उघडणार असला तरी मनपाने दिलेल्या सवलतीचा काही लाभ सामान्य रसिकांनादेखील होणे आवश्यक असल्याचा सूर नाट्यप्रेमी रसिकांनी व्यक्त केला आहे. कालिदासमध्ये वर्षाच्या प्रारंभीच्या आठवड्यातच नाटकाचा शुभारंभ होत आहे. प्रारंभीचे नाटक सामाजिक असल्याने संबंधित संस्थेच्या वतीने ते मोफत दाखवले जाणार आहे. मात्र, त्यानंतर जेव्हा व्यावसायिक नाटकांचे प्रयोग होतील, त्यावेळी त्या नाटकांचे प्रयोग पूर्वीच्याच दराने करणे व्यावसायिकांना क्रमप्राप्त आहे. आधीच सामाजिक अंतर राखून प्रेक्षकांची आसनव्यवस्था करावी लागणार असल्याने त्यांना निम्मीच तिकीटे विकता येणार आहेत. तसेच प्रेक्षकांची चाचणी, त्यांची सुरक्षितता, सभागृहाचे सॅनिटायजेशन या सर्व बाबींचा भार आधीच त्यांच्यावर पडणार आहे. त्यामुळे नागरिकांना अजून तिकीट दरात काही सवलत देणे त्यांना शक्य होणार नाही. अशा परिस्थितीत महापालिकेने ज्याप्रमाणे वर्षभरासाठी कालिदासच्या भाड्यात निम्मी कपात करुन नाट्यव्यावसायिकांना काहीसा दिलासा आहे, त्याचप्रमाणे नाट्य रसिकांनादेखील अल्पसा तरी दरात दिलासा देण्याची रसिकांची मागणी आहे. नाटके चालविण्यात नाट्यरसिकांचे योगदान मोलाचे असते. कोरोना काळात प्रत्येक नागरिकालाच आर्थिक ओढाताणीचा सामना करावा लागला आहे. मात्र, तशा परिस्थितीतही प्रेक्षक पुन्हा नाट्यगृहांकडे वळण्यास तयार आहे. परंतु, त्यासाठी त्यांनादेखील नाटकांच्या तिकीट दरात सवलत मिळाल्यास ते अधिक प्रमाणात पुन्हा नाटकांकडे परतू शकतील. त्यातून पुन्हा रंगभूमी बहरण्याच्या प्रक्रीयेला गती येऊ शकेल. त्यामुळे पडत्या काळातील रंगभूमीला सावरण्यासाठी महापालिकेने नाट्यरसिकांच्या मागणीचा विचार करण्याची आवश्यकता आहे.
नाट्य रसिकांनाही मिळावा सवलतीचा लाभ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 9:12 PM