.नाशिक : ‘जुन्या नाशकातील अरूंद गल्ल्यांमधील बाजारपेठेत मनसोक्त शॉपिंग करायची, सायकलिंगचा आनंद लुटायचा, मेनरोडवरील जुन्या नगरपालिका इमारतीतील संग्रहालयात नाशिकच्या वैभवाचा इतिहास डोळे भरून पाहायचा, वाघाडी नाल्यातील वॉकिंग पाथवेवर काही वेळ भटकायचे आणि पेशवेकालीन सरकारवाड्यातील कॉफीशॉपमध्ये मस्तपैकी कॉफीपान करून भरल्या मनाने घरी परतायचे...’हे सारे स्वप्नवत वाटतेय ना? परंतु हे सारे स्वप्न स्मार्ट सिटी अभियानांतर्गत प्रत्यक्षात उतरविण्यासाठी महापालिका प्रशासनाने क्रिसिल संस्थेच्या माध्यमातून प्रस्ताव तयार केला आहे. जुन्या नाशकात स्वप्नांचे इमले बांधणाऱ्या या प्रस्तावाचे शुक्रवारी महापालिकेतील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसमोर सादरीकरण झाले तेव्हा तासभर सारेच कल्पनेच्या डोहात मनसोक्त डुंबले आणि नंतर वास्तवाची कल्पना देत प्रशासनाला भानावर आणण्याच्या प्रयत्नात गुंतले. स्मार्ट सिटी अभियानातील दुसऱ्या टप्प्यातील चॅलेंज स्पर्धेसाठी नाशिक महापालिकेला परिपूर्ण प्रस्ताव येत्या ३ डिसेंबरपूर्वी राज्य सरकारला सादर करावयाचा आहे. या प्रस्तावासाठी महापालिकेने क्रिसिल या संस्थेला सुमारे सव्वा कोटी रुपये मोजले असून संस्थेने तयार केलेल्या प्रस्तावाचे दृक माध्यमातून सादरीकरण महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती, विरोधी पक्षनेते आणि सर्वपक्षीय गटनेत्यांसह जुन्या नाशकातील नगरसेवकांसमोर करण्यात आले. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी या प्रस्तावाची माहिती देताना सांगितले, स्मार्ट सिटी अभियान अंतर्गत एखाद्या भागाच्या विकासावर भर द्यायचा असून त्यासाठी ६९५ एकर परिसरात पसरलेल्या आणि शहराची सांस्कृतिक व ऐतिहासिक ओळख असलेल्या जुने नाशिक भागाची निवड करण्याचे प्रस्तावित आहे. तयार केलेल्या प्रस्तावात जुन्या नाशकातील मध्यवर्ती भागात पादचारी मार्ग, सायकलिंगवर अधिक भर राहील. गोदावरी नदीकाठच्या दोन्ही बाजूंनी सायकल ट्रॅक उभारण्यात येईल. त्याला जोडणारे रस्ते राहतील. गोदाकाठ परिसरात पर्यटन व विरंगुळा केंद्र राहील. रस्त्यांच्या प्रवेशाच्या ठिकाणी आकर्षक द्वार उभे राहतील. छोट्या अरूंद गल्ल्यांमध्ये शॉपिंगला चालना दिली जाईल. सरकारवाड्यात कॉफीशॉप बनेल. मेनरोडवरील नगरपालिकेच्या जुन्या इमारतीत नाशिकचा इतिहास सांगणारे संग्रहालय असेल. महत्त्वाचे रस्ते दगडी पेव्हर ब्लॉकने तयार केले जातील. महात्मा गांधी मार्गावर वाहतुकीसाठी जागा कमी व पादचाऱ्यांना जास्त जागा उपलब्ध होईल. वाघाडी नाल्यात वॉकिंग पाथवे असेल. महत्त्वाची मंदिरे व वास्तू यांच्यासाठी हेरिटेज वॉक प्रस्तावित आहे. खासगी विकसकांमार्फत काझीगढीचा भाग विकसित होईल. जुने नाशिकला जोडूनच मखमलाबाद, तपोवन, हनुमानवाडी परिसरात ग्रीन फिल्ड अंतर्गत विकास केला जाईल. आनंदवल्ली बंधारा ते रामवाडी पुलापर्यंतच्या नदीकाठी मरिन ड्राईव्हच्या धर्तीवर शॉपिंग मॉल्स उभा राहील. हे सारे स्वप्न साध्य करण्यासाठी अर्थातच जुन्या नाशिकमधील रस्ते रूंद करण्यासाठी इमारती, जुने वाडे यांचे सद्यस्थितीतील बांधकाम मागे हटविण्यात येईल. भूसंपादनाऐवजी घर-इमारत मालकांना सुमारे चार ते साडेचार एफएसआय दिला जाऊ शकतो, पूररेषेतीलही बांधकामांना अभय मिळू शकते आणि संपूर्ण जुने नाशिकचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे आयुक्त डॉ. गेडाम यांनी यावेळी स्पष्ट केले. बैठकीला शहर विकास आराखडा तयार करणारे नगररचनाचे उपसंचालक प्रकाश भुक्ते यांनाही निमंत्रित करण्यात आले होते.(प्रतिनिधी)
जुन्या नाशकात स्वप्नांचे इमले!
By admin | Published: November 27, 2015 11:18 PM