घोटी : पहिल्याच पावसात जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध करून रस्त्यांचा लेखाजोखा मांडल्याने, शासनाने याची गंभीर दखल घेत पावसातच रस्त्यांच्या दुरुस्तीच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने संबंधित ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. यानुसार इगतपुरी तालुक्यात घोटी - सिन्नर रस्त्याची भरपावसात दुरु स्ती करण्यात येत आहे.घोटी - सिन्नर रस्त्याच्या दुरु स्तीचे काम चार महिन्यांपूर्वी करण्यात आलेले असताना संबंधित ठेकेदाराने रस्त्याच्या कामाची गुणवत्ता न राखल्याने पहिल्याच पावसात या प्रचंड खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली होती, तर घोटी - वैतरणा रस्त्यावर कुर्णोली ते भावली बु।। या पर्यायी नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्याचीही प्रचंड खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाली आहे. याबाबत ‘लोकमत’ने बुधवारी विशेष वृत्त प्रसिद्ध करून रस्त्याच्या खड्ड्यांवर प्रकाशझोत टाकला होता.दरम्यान, या वृत्ताची शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने दखल घेत रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराला सदर रस्त्यावरील खड्ड्यांची तत्काळ दुरु स्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार या दुरुस्तीचे काम आजपासून हाती घेण्यात आले असून, भर पावसात हे काम करण्यात येत आहे. घोटी - वैतरणा रस्त्यावरील कुर्णोली ते भावली बु।। या पर्यायी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पुनर्वसनांतर्गत निधी मंजूर केला असल्याची माहिती सहाय्यक अभियंता हरिभाऊ गिते यांनी दिली. (वार्ताहर)
घोटी-सिन्नर रस्त्याची भरपावसात मलमपट्टी
By admin | Published: July 21, 2016 11:31 PM