श्याम बागुल /नाशिक‘सुकलेल्या झाडांना पाणी घालून काय उपयोग’ असा व्यावहारिक व वास्तवादी सवाल उपस्थीत करून सेनेच्या नाना घोलप यांनी आपल्या पुर्वाश्रमीच्या फुलमाळा विक्रीच्या व्यवसायाचे अनुभवाचे बोल शिवसेनेच्या नवनिर्वाचित महानगर प्रमुखांसह जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांना सुनावले. त्यांचे हे अनुभवाचे बोल अर्थातच आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने होऊ पहात असलेल्या कॉँग्रेस व राष्ट्रवादीशी संभाव्य युतीच्या चर्चेने होता हे एरव्ही सर्वांच्या लक्षात आले असेल.
गेली तीस वर्षे आमदारकी व त्यापेक्षाही अधिक वर्षे समाजकारण-राजकारणात घातलेल्या नाना घोलप यांचा हा सल्ला देण्यामागचा हेतू देखील तितकाच शुद्ध होता. कॉँग्रेस व राष्ट्रवादीची ताकद नसतानाही या दोन्ही पक्षांना आगामी महापालिका निवडणुकीत सेनेबरोबर घेतल्यास सेनेच्या मदतीने या दोन्ही पक्षांना उर्जितावस्था मिळेल, परिणामी या निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या सेनेच्या सैनिकांवर अन्याय होईल अशी भावना नाना घोलप यांची त्यामागे होती व असावी असे मानल्यास ती योग्यच आहे असे म्हणावे लागेल. परंतु हाच न्याय अन्य बाबतीत लावायचा म्हटल्यास नाना घोलप यांना आपला स्वपक्ष याच राष्ट्रवादी व कॉँग्रेसच्या मदतीने सत्तेवर आला हे विसरून कसे चालेल ? एक मात्र खरे लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात भाजपा व सेनेने कॉँग्रेस व राष्ट्रवादीला आपल्याच पातळीवर निष्प्रभ ठरविले होते. स्वत: नाना घोलप यांचा पुत्र देखील देवळाली मतदार संघाच्या मैदानात उतरलेला असताना नाना घोलपांनी पूत्र योगेश व राष्ट्रवादीच्या प्रतिस्पर्धी सरोज अहिरे या दोघांच्या मस्तिष्काच्या रेषा पाहून भविष्य वर्तविले होते व निवडणुकीपूर्वी सेनेचा व पर्यायाने योगेशचा विजय झाल्याचे भाकीत केले होते. प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतर नाना घोलपांनी वर्तविलेले भविष्य खोटे ठरले व शिवसेनेचा सलग तीस वर्षे बालेकिल्ला असलेला देवळालीचा गड कोसळला. बहुधा हाच पराभव नानांच्या अधिक जिव्हारी लागलेला असावा. सलग तीस वर्षे मतदार संघाच्या विकासाचा ध्यास घेवून प्रत्येकाच्या सुख-दुखात सहभागी होवूनही मतदारांनी नाना घोलप यांना दिलेल्या धोक्याचा धक्का ते अजुनही पचवू शकलेले नाहीत. नाना घोलपांनी तीस वर्षे मतदार संघ ताब्यात ठेवतांना केलेल्या ‘नाना क्लृप्त्या’ पाहता, त्यांच्या आजवरच्या विजयात कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या काही ‘सुकलेल्या झाडांचाही’ हात होता हे नाकारता येणार नाही. त्यामुळे निवडणुकीपूर्वी निष्प्रभ ठर(वि)लेल्या राष्ट्रवादीच्या नवख्या उमेदवाराने नाना घोलपांचा पराभव करणे म्हणजेच सुकलेल्या झाडाला पुन्हा पालवी फुटण्याचाच हा प्रकार म्हणावा लागेल. राहिला प्रश्न नाना घोलप यांना शिवसैनिकांच्या पडलेल्या काळजीचा तर तो देखील रास्तच म्हणावा लागेल. ज्या सैनिकांच्या बळावर तीस वर्षे गड भक्कम ठेवला, त्या सैनिकांचे बळ गेल्या निवडणुकीत अचानक कमी होणे तसे म्हटले तर शक्यच नाही. मात्र कळत न कळत सलग तीस वर्षे या सैनिकांकडे नाना घोलपांचे दुर्लक्ष होणे व त्यांनीही निवडणुकीत धडा शिकविण्याची बाब उशीराने का होईना नाना घोलपांच्या लक्षात आले असेल हे काय कमी?