सुनील शिंदे घोटीनिम्म्या महाराष्ट्रासह मुंबई महानगरची तहान भागविणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील ठाणे,पालघर आणि अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवर असणाऱ्या गावांना पाणीटंचाईच्या झळा बसणे ही दरवर्षाची नित्याची बाब ठरली आहे. शासनाची नियोजनशून्यता, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष व ग्रामसेवक आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचा मनमानीपणा यामुळे या टंचाईग्रस्त गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागत नाही ही शोकांतिका आहे.अनेक धरणे आणि पर्जन्याचा तालुका अशी इगतपुरी तालुक्याची ओळख आहे. मार्च महिन्यातच राज्याच्या राजधानीला पाणी पुरवणाऱ्या या तालुक्याला पाणीटंचाईचे ग्रहण लागले आहे. अनेक वर्षांपासून तालुक्यातील अनेक गावांतील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागण्याची स्थिती बदललेली नाही. असे असताना नेहमीच पाणीटंचाईने ग्रासलेल्या गावांच्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची भूमिका उदासीन आहे. पाणीप्रश्नावर निवडणुका लढवून त्यानंतर गंभीरपणे या प्रश्नाकडे कोणी पाहत नसल्याने दरवर्षी ‘ये रे माझ्या मागल्या’प्रमाणे यंदाही तालुक्याची ओळख तृषार्त तालुका अशीच राहण्याची दाट शक्यता आहे. पाणीटंचाईचा निकष ठरवताना असलेली नियमावली अनेक वाड्या पाड्यांना जाचक ठरत आहे.इगतपुरी तालुक्यातील दारणा नदीलगत आण िलहान, मोठ्या धरणालगत असणार्या अनेक गावांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची स्थिती आहे. महिलांना पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत गावापासून दूरवर अंतरावर असलेल्या विहिरीवरून पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागते.गेल्या वर्षी चांगला पाऊस होऊनही तालुक्याला संभाव्य स्थितीत भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. मार्च मिहन्यातच इगतपुरी तालुक्यातील अनेक गावांत वाड्यापाड्यांत कृत्रिम पाणीटंचाईचे भीषण संकट उभे राहिले आहे. पूर्व भागातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागल्याने येथील महिला वर्गासह शाळकरी विद्यार्थ्यांनाही पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.इगतपुरी तालुक्यात अर्ध्या महाराष्ट्राला पाणी पुरवण्याची क्षमता असूनही हा पाण्याचा तालुका आज तहानलेला आहे. गेल्या महिन्याभरापासून अनेक गावांत पाणीटंचाईच्या तीव्र झळा लागल्या आहेत. एवढेच नव्हे तर विविध गावांतील अनेक योजना आज कुचकामी ठरल्याने पाणीटंचाईचे गांभीर्य वाढले आहे.तालुक्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रश्नी उदासीनता दाखवली तर मुख्यालयी न राहणाऱ्या ग्रामसेवक आणि तलाठ्यांना पाणीटंचाईची जाणीव होणार तरी कशी, असा सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे.पावसाचे माहेरघर व पावसाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्याला पाणीटंचाईचे ग्रहण लागले आहे. हा तालुका डोंगराळ व खडकाळ भागाचा असल्याने ग्रामीण भागातील विहिरींनी तळ गाठला आहे. बहुतांश पाण्याचे स्रोत आटल्याने पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. टाकेद, खेड परिसरातील अनेक गांवानी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. वैतरणा परिसरातही अनेक गावांत आज कृत्रिम पाणीटंचाई जाणवत आहे.
धरणांच्या तालुक्याला पिण्याच्या पाण्याची वानवा
By admin | Published: April 24, 2017 1:10 AM