इंदिरानगर : महापालिकेच्या पूर्व विभागाच्या वतीने परिसरात जलवाहिनीस विद्युत मोटारी लावून पाणी खेचणारे आणि पाण्याचे अपव्यय करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तेरा विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.दोन दिवसांपूर्वी प्रभाग २३, ३०, ३१ मधील चेतनानगर परिसरातील कृत्रिम पाणीटंचाई संदर्भात महापौर दालनात महापौर रंजना भानसी यांच्यासमवेत प्रभागाच्या नगरसेवकांची बैठक झाली. यावेळी पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास कारवाईस सामोरे जा, असा आदेश पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आला होता. त्याची तातडीने दखल घेत कृत्रिम पाणीटंचाईस जलवाहिनीस थेट विद्युत मोटारी लावून पाणी खेचणे, अनधिकृत नळजोडणी आणि पाण्याचा अपव्यय जबाबदार आहे. त्यामुळे पूर्वविभागाच्या विभागीय अधिकारी जयश्री सोनयरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विरोधात धडक मोहीम राबविण्यात सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये पांडवनगरी परिसरात पाच व विनयनगर येथील प्रणवानंद अपार्टमेंट येथे आठ अशा एकूण १३ विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच साई मोटर्स येथे पिण्याच्या पाण्याने वाहन धुणे, पाणीगळतीमुळे नळजोडणी बंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)
विद्युत मोटार जप्तीची धडक मोहीम
By admin | Published: April 22, 2017 12:42 AM