सटाणा : येथील पालिका प्रशासनाने थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. पट्टी न भरणाऱ्या सुमारे शंभरहून अधिक मालमत्ताधारकांवर नळजोडण्या तोडण्याची कारवाई करण्यात आली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात घरपट्टी व पाणीपट्टी थकल्याने विकासकामे करताना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. महसूल गोळा करण्याच्या दृष्टीने पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील जुने शहर व नववसाहत भागात तीन ते चार वर्षांपासून पट्टी थकबाकीदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा थकबाकीदारांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने भरारी पथकाकडून तत्काळ नळजोडण्या तोडून त्यांना सील लावण्यात आले आहे. या पथकाने शंभरहून अधिक मालमत्तधारकांवर कारवाई केली आहे. ज्या मालमत्ताधारकांनी नळाचे सील काढून जोडणीचा प्रयत्न केला अशांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ज्या थकबाकीदारांना पाणीपुरवठा सुरळीत करायचा असेल त्यांनी थकबाकीसह पाचशे रु पये दंड भरल्यास त्यांची नळजोडणी तत्काळ करण्यात येणार आहे. थकबाकीदारांनी कारवाई टाळण्यासाठी घरपट्टी, पाणीपट्टी भरून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, माजी नगरसेवक किशोर कदम यांनी ही कारवाई म्हणजे प्रशासनाकडून नागरिकांवर अन्याय होत असल्याचे म्हटले आहे. शहरातील सुमारे चाळीस टक्के भागात वर्षाच्या सहा महिने नळांना पाणीच येत नाही. त्यामुळे पाणीपट्टी वसूल करणे हा त्यांच्यावर अन्याय असल्याचे ते म्हणाले. (वार्ताहर)
वसुलीसाठी धडक मोहीम
By admin | Published: March 06, 2017 12:36 AM