पिंपळगाव बसवंत : येथून जवळच असलेल्या साकोरा (मिग) फाट्यावर साकोरेहुन पिंपळगावच्या दिशेने जाणारी मारुती सियाज कंपनीच्या कारला अचानक लागलेल्या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कारने अचानक पेट घेतल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. तर महामार्ग असल्याने दोन्ही बाजूकडील वाहतुक ठप्प झाली होती. याबाबत माहिती अशी की, निफाड तालुक्यातील साकोरा (मिग) येथील संजय चंद्रभान शिंदे (वय ५४ ) हे आपल्या सियाझ कंपनीच्या (क्रमांक एमएच-१५-एफएन-४१७७) कारमधून पिंपळगाव बसवंतच्या दिशेने मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास खासगी कामानिमित्त निघाले होते. शिंदे यांची कार साकोरा फाट्यावरून पिंपळगाव बसवंतकडे मार्गस्थ होताच गाडीने अचानक पेट घेतला. अचानक घडलेल्या या घटनेने शिंदे यांना काय करावे हे सुचेना. गाडीचे सर्व दरवाजे आणि काचा लॉक असल्यामुळे गाडीबाहेर पडणे शिंदे यांना शक्य झाले नाही. बघता बघता संपूर्ण गाडीने पेट घेतला. नागरिकांनी गाडीच्या पाठीमागील काच देखील फोडली. मात्र, आगीने इतके मोठे रौद्र रूप धारण केले की शिंदे यांचा अक्षरश: होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव बसवंत अग्निशामक दलाचे प्रमुख सुनील मोरे पथकासह घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. तर, पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक सुरेश चौधरी, महामार्गच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा कदम यांनी कमर्चार्यांसह धाव घेत मदतकार्य केले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे मदतकार्यास अडथळा येत होता. मात्र, पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवले. साकोरा (मिग) येथील विद्यमान सरपंच विमल शिंदे यांचे ते पती होत. त्यांच्या पश्चात आई, दोन, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
कारला लागलेल्या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 1:27 PM