नाशिक : सिन्नर माळेगाव एमआयडीसीतील सुजित इंडस्ट्रीज कंपनीतून मुंबईला माल घेऊन जाणारा कंटेनर सिन्नर घाटात दुभाजकामध्ये उलटल्याने अपघात झाला. या अपघातात कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.पिंपरी चिंचवड येथील अनील कार्गो कंपनीचा कंटेनर एम एच 14 एच जी 1330 हा सिन्नर माळेगाव एमआयडीसीतील सुजित इंडस्ट्री मधून माल घेऊन गुरुवारी (दि.11) दुपारी मुंबईला जाण्यासाठी निघाला होता.
हा कंटेनर नाशिककडे येत असताना सिन्नरचा घाट उतरल्यानंतर चालकाचे वाहनावरील निंयत्रण सुटल्याने कंटेनर महामार्गाच्या दुभाजकामध्ये उलटला. या अपघातात कंटेनर मधील क्लीनर गाडी बाहेर फेकल्याने कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र कंटेनर चालक हा गाडीतच अडकून पडला होता. अपघात होताच घटनास्थळी येणारे जाणारे वाहनचालक थांबल्याने मोठी गर्दी झाली होती. सिन्नर व महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, जमा झालेल्या नागरिकांनी मोठ्या क्रेनच्या साह्याने कंटेनरला सरळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये ते यशस्वी झाले नाही. अखेर नागरिकांनी कंटेनरची पुढील काच व दरवाजा तोडून जखमी चालकास बाहेर काढले. त्यानंतर त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, कंटेनर दुभाजकामध्ये पलटी झाल्याने महामार्गावरील दोन्ही बाजूच्या वाहतुकीला कोणताही अडसर निर्माण झाला नसल्याने वाहतूक सुरू होती. कंटेनर चालक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवत असल्याने अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.