संदीप झिरवाळ -पंचवटी : मुंबई येथून युरिया खताची पोती घेऊन धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या मालट्रकच्या चालकाचा उड्डाणपूल उतरल्यानंतर आडगाव शिवारात डोळा लागला अन् भरधाव दहा चाकी अवजड ट्रक महामार्गावरील उड्डाणपूल उतरताना रॅम्पवर उलटला. रविवारी (दि.१०) पहाटे सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यामध्ये जीवीतहानी टळली; मात्र ऐन रविवारच्यादिवशी महामार्गावरील वाहतूकीचा खोळंबा झाला. सुमारे चार तास वाहतूक ठप्प झाली होती.
मुंबई येथून युरियाच्या गोण्या भरून रात्री मुंबई-आग्रा महामार्गावरून निघालेला दहा चाकी अवजड ट्रक (एम.पी.०९ एचएच४५७१) नाशिकमार्गे मालेगावला जाणार होता. नाशिक शहरातून बाहेर पडल्यानंतर वेशीवर आडगाव शिवारात उड्डाणपुलाचा उतारावरून खाली येताना अचानकपणे चालकाला डुलकी आली आणि ट्रकवरील नियंत्रण सुटले. यामुळे भरधाव ट्रक रॅम्पवरून घरंगळत खाली आला. सुदैवाने यावेळी अन्य वाहने नव्हती अन्यथा भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत चालक, क्लीनरला काही प्रमाणात मार लागला आहे.
घटनेची माहिती मिळताच आडगाव, पंचवटी पोलीस, वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस हवालदार सुरेश नरवडे, दादासाहेब वाघ, सचिन बहिकर, विलास चारोस्कर आदींसह जखमी चालक व क्लिन ला ट्रकच्या कॅबिनमदून बाहेर काढले. तोपर्यंत धुळ्याकडे जाणारी वाहतूक उड्डाणपूलावर थांबली होती. वाहतुक कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपूलावरील नाशिक बाजूकडून धुळ्याकडे जाणारी वाहतूक बळी मंदिरापासून खाली महामार्गावर वळविण्यात आली होती. यानंतर सुमारे चार तासाच्या अथक परिश्रमानंतर महामार्ग वाहतूकीसाठी खुला झाला. याप्रकरणी संध्याकाळपर्यंत आडगाव पोलिस ठाण्यात कुठल्याहीप्रकारची नोंद करण्यात आलेली नव्हती.