नाशिक : जळगाव जिल्ह्यातून वसई, पालघरकडे निघालेल्या बसेस नाशिकमध्ये येताच त्यावरील चालक-वाहकांची ड्युटी ब्रेक करून त्यांची बस नाशिकचे चालक-वाहक घेऊन पुढे गेल्याचा अनाकलनीय प्रकार सोमवारी घडला. यामुळे जवळपास २० चालक-वाहकांना एक रात्र आणि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत नाशिकमध्येच सक्तीने थांबावे लागले. या घटनेमुळे त्यांना प्रचंड मनस्तापही सहन करावा लागला.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, जामनेर, चोपडा, यावल येथून एसटी बस घेऊन वसई, पालघर, भोईसर, अर्नाळाकडे निघालेले चालक-वाहक नाशिकमध्ये येताच नाशिक डेपोने जळगावमधून आलेल्या चालक-वाहकांना उतरवून घेत नाशिकच्या चालक-वाहकांना बसचा ताबा घेतला आणि पुढील प्रवासासाठी बस घेऊन निघून गेले. महामंडळाच्या आदेशानुसारच ‘ड्युटी ब्रेक’ करण्यात आल्याचे सांगून त्यांना बस परत नाशिकमध्ये येईपर्यंत मुक्काम करण्यास सांगण्यात आले. यापूर्वी असा प्रकार कधी घडलेला नसल्याने जळगाव जिल्ह्यातून आलेले चालक-वाहक गोंधळून गेले. अगोदरच न मिळणारी ड्युटी तसेच वेतनाला होणारा विलंब यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेले कर्मचारी ओव्हरटाइम मिळेल या अपेक्षेने लांब पल्ल्याची ड्युटी स्वीकारतात. त्यानुसार या कर्मचाऱ्यांनी जळगाव ते ठाणे, मुंबई अशा बसची ड्युटी स्वीकारली. त्या तयारीनेच ते निघाले होते. एखाद्या अधिकृत हॉटेलवर बस थांबविली तर तेथे जेवणाचा प्रश्न मिटतो. दुसऱ्या दिवशी सकाळी नाष्टा करून ते पुन्हा परतीच्या प्रवासाला लागतात. त्यातून त्यांना दोन पैशांचा लाभही होतो. परंतु नाशिकमध्ये येताच त्यांना भलत्याच अनुभवला सामोरे जावे लागले.