दिंडोरी तालुक्याचा पश्चिम भाग तालुक्याला जोडणारा ननाशी - दिंडोरी हा महत्वपूर्ण रस्ता आहे .या रस्त्याची सध्याची परिस्थिती पाहता खड्ड्यात रस्ता शोधण्याची वेळ आली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी एवढे खड्डे पडले आहेत, की वाहन चालविताना चालकाला प्रश्न पडतो की कुठला खड्डा टाळावा आणि त्यातून मार्ग कसा काढावा .३५ किलोमीटर अंतराचा हा रस्ता असून, नित्य वर्दळीचा आहे. परिसरातील नागरिकांना शासकीय कामासाठी दिंडोरी येथे याच रस्त्यावरून यावे लागते. तसेच शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीसाठी न्यायचा झाल्यास याच रस्त्यावरून खडतर प्रवास करीत न्यावा लागतो. परिणामी रस्त्याच्या या दयनीय अवस्थेमुळे येथील प्रवास प्रचंड त्रासदायक आणि वेळखाऊ बनला आहे.सदर रस्ता निळवंडी ते वलखेडफाटा दरम्यान काही ठिकाणी खूपच चिवळ झाला असून, त्यामुळे छोटे-मोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. दरम्यान, नादुरुस्त आणि खड्डेमय रस्त्यामुळे वाहने चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून, वाहनाचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी वाहनचालकांना शारीरिक त्रास व आर्थिक भुर्दंडही मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. रस्त्याची डांबर गायब झाल्याने खडी उघडी पडली आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे उडणाऱ्या धुळीमुळे आजूबाजूच्या शेतातील पिकांवरही विपरीत परिणाम होत असून, लोकांना श्वसनाचे आजारही वाढत आहे.
दिंडोरी-ननाशी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहनचालक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 3:47 PM