नाशिक : विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या तसेच राजकीय पक्षांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष केंद्रित केले जाणार असून, निवडणुकीतील गैरप्रकाराबरोबरच अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी मतदारसंघातील संवेदनशील भागांवर ड्रोनच्या साहाय्याने लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आरती सिंग यांनी दिली. कायदा आणि सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी समाजातील यादीवरील गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे.जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीची प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली असतानाच पोलीस यंत्रणेलादेखील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. या संदर्भातील पोलीस अधीक्षक सिंग यांनी सांगितले की जिल्ह्यातील काही मतदारसंघांमध्ये संवेदनशील परिसर असून, अशा परिसरावर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. मालेगावमधील मतदारसंघातील अनेक वस्त्यांवर ड्रोनद्वारे लक्ष केंद्रित केले जाणार आहेच शिवाय जिल्ह्यातील अन्य काही मतदारसंघांमधील अडचणीचे क्षेत्र असलेल्या परिसराचीदेखील माहिती घेतली जात असल्याचे सिंंग यांनी सांगितले.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील यादीवरील ५० गुंडांविरुद्ध तडीपारीची कार्यवाही करण्यात आली असून, त्यांना नजीकच्या तीन जिल्ह्यांमधून तडीपार करण्यात आलेले आहे, तर शंभरपेक्षा अधिक गुंडांवर झोपडपट्टी दादा प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. जिल्ह्यांच्या सीमारेषांवर आताच नाकाबंदी वाढविण्यात आली असून, मागील आठवड्यात तीन लाखांपेक्षा अधिक रकमेचा मद्यसाठा जप्त करण्यात आलेला आहे. शुक्रवारी गुजरातहून येणारा सुमारे २६ लाखांचा गुटखादेखील जप्त करण्यात आल्याची माहिती सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. गुन्हेगारीचे केंद्र असणाऱ्या मोठ्या प्रमाणात वसलेल्या वसाहतींमध्ये जाऊन कार्यवाही करण्याची असलेली मर्यादा लक्षात घेता ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवणे शक्य होणार असल्याने अशा परिसराची यादी तयार करण्यात आली आहे. या वसाहतींवर लक्ष केंद्रित केले जाणार असून, येथील गुन्हेगारांवरदेखील लक्ष केंद्रित केले जाणार आहे.शहरात पोलीस आयुक्तांनीदेखील कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने ११६ गुंडांवर तडीपारची कारवाई केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत दहा जणांवर झोपडपट्टी दादा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.१२० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. शहरातून चार जणांकडून विनापरवाना शस्त्र वापरणाऱ्यांकडून शस्त्र जप्त करण्यात आले असून, आठ काडतुसेदेखील जप्त करण्यात आले आहेत. एका संशयिताकडून तलवार जप्त करण्यात आली आहे.
संवेदनशील भागावर आता ड्रोनची नजर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:45 AM