राजापूर परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्याने येथील वाड्या-वस्तीवर पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरीपाची संपूर्ण पिके वाया गेली आहेत. मका पीक हिरवे दिसतात, परंतु दाणे भरण्यासाठी पुरेसा पाऊस नाही. शेंदरी बोंडअळीने कपाशीचेही नुकसान झाले. पोळ कांद्याची लागवड केली परंतुा पावसाअभावी रोपे वाळली आहेत. मशागत व लागवडीसाठी केलेला खर्चही वसूल होणार नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. विहीरींना पाणी नाही, मजुरांना कामे नाहीत या चिंतेने शेतकरी व मजूर हवालदिल झाले आहेत. राजापूर हे गाव उंचावर असल्याने येथे कूठल्याही सिंचनाची सूविधा नाही. त्यामुळे दूष्काळ येथील जनतेच्या पाचवीलाच पुजलेला आहे. निसर्गाच्या भरवशावर शेती कशी करावी व पिण्यासाठी पाणी नाही अशा परिस्थितीत उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना अस्वस्थ करीत आहे. पिके करपून गेल्याने एक महिन्यानंतर जनावरांसाठी चाराटंचाईचा प्रश्न निर्माण होणार या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने राजापूर परिसरातील दूष्काळसदूश परिस्थितीचा आढावा घेऊन या भागात दुष्काळ जाहीर करावा, पिकाची नूकसान भरपाई द्यावी व दुष्काळीे कामे सुरू करावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
राजापूर परिसरात दुष्काळ सदृश परिस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 5:53 PM