नाशिकरोड : पुणे-मुंबई-नाशिक असा ‘सुवर्णत्रिकोण’ ड्रग्जमाफियांनीसुद्धा शोधून काढला आहे. कल्याणच्या घास-बैल बाजारात विक्री केले जाणारे ड्रग्ज नाशिकमधील फॅक्टरीचे असल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासातून पुढे येत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कल्याणमधील बाजारात ‘माल’ खरेदी करणारा व पुढे पुणे, मुंबई, बंगळुरूसह नाशिकमध्ये पुरविणारा नेमका ‘धनी’ कोण हे शोधण्याचे मोठे आव्हान साकीनाका पोलिसांपुढे उभे राहिले आहे. नाशिक शहराच्या वेशीवर पुणे महामार्गालगत शिंदे गावाच्या शिवारात अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना जोरात चालविला जात होता. याबाबतची मोठी ‘लीड’ मुंबईच्या साकीनाका पोलिसांच्या हाती ‘रफिक’च्या माध्यमातून लागली. संशयित रफिक नामक व्यक्तीला उचलल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरून साकीनाका पोलिसांनी नाशिकमध्ये येऊन अमली पदार्थ बनवणारा कारखाना शोधून तो उद्ध्वस्त केला.
तब्बल २५० कोटींपेक्षा जास्त किमतीचे १३३ किलो अमलीपदार्थ या ठिकाणाहून पोलिसांनी जप्त केले आहे. या कारवाईनंतर नाशिक पोलिससुद्धा खडबडून जागे झाले आहेत.
- या कारखान्यात बनवण्यात येणाऱ्या अमली पदार्थाची थेट नाशिकमध्ये विक्री न होता ते येथून कल्याणच्या घास-बैल बाजारात पाठविले जात होते व तेथून पुढे विविध शहरांमध्ये पेडलरमार्फत ते विक्री केले जात असल्याची माहिती साकीनाका पोलिसांच्या तपासातून पुढे येत आहे.
- साकीनाका पोलिस कारवाई करून शुक्रवारीच नाशिकमधून परतले आहेत. हा कारखाना ड्रग्जमाफिया फरार ललित पाटीलचा भाऊ भूषण चालवित होता. तो केमिकल इंजिनिअर असल्याने त्याने अमलीपदार्थ तयार करण्याचा हा ‘उद्योग’ थाटला होता.