नाशिक : कोरोना काळात सर्व महापालिका आणि नगरपालिकांच्यावतीने तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत औषधांची व्यवस्था करण्यात आली होती. तरीदेखील अनेक नागरिकांनी केवळ कोरोनाचा संशय म्हणून किंवा अन्य काही व्याधी म्हणूनदेखील डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी विक्रेत्यांकडे जाऊन औषधे घेतली. काही विक्रेत्यांनी अशा ग्राहकांना डॉक्टरांच्या चिठ्ठीसाठी माघारी धाडले. तर अनेक औषध विक्रेत्यांनी बिनाचिठ्ठीची औषधे देऊन औषधविक्रीच्या मूळ नियमालाच हरताळ फासला. त्यामुळे अशाप्रकारे थेट औषधविक्री करणाऱ्या १९ विक्रेत्यांवर वर्षभरात अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नियमांचे उल्लंघन करणाऱ्या औषध विक्रेत्यांविरोधात कारवाई केली आहे. विभागाच्या औषध निरीक्षकांनी शहरातील औषध विक्रेत्यांना नोटीस बजावून औषध विक्री थांबविण्याची कारवाईदेखील केली. एफडीएच्या औषध निरीक्षकांनी जुने नाशिक भागात काही औषधी दुकांनाची तपासणी केली. त्यावेळी दुकानदार हे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय प्रिस्किप्शन व बिलाशिवाय औषध विक्री करत असल्याचे आढळून आले. त्या औषध विक्रेत्यांना औषध विक्री तत्काळ थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर अन्य काही औषध विक्रेत्यांवर औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
इन्फो
कोरोनाकाळात सर्दी, अंगदुखीसाठी डॉक्टरांकडे कोण जाणार ?
कोरोना काळामध्ये घराबाहेर पडणे हेच जीवावरचे संकट वाटू लागले होते. अशा परिस्थितीत अल्पशी सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी, रक्तदाबावरील नियमित गोळी या छोट्या आजारांसाठी डॉक्टरांकडे जाणे म्हणजे अलगद कोरोना रुग्णांच्या विळख्यात जाऊन पडण्यासारखे होते.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून अनेक नागरिकांनी घराजवळच्या किंवा कुणी ओळखीच्या औषध विक्रेत्यांकडे जाऊन त्यांच्यासाठीच्या औषधांची खरेदी केली. काही ठिकाणी ओळखीखातर तर काही ठिकाणी व्यवसाय होतोय तर कशाला सोडा म्हणून विक्रेत्यांनी चिठ्ठीशिवाय औषधे दिली.
अनेक ठिकाणी मिळतात चिठ्ठीशिवाय औषधी
नाशिकरोड
नाशिकरोड परिसरात तर अनेक दुकानांमध्ये जवळपासच्या गावांमध्ये येणारे ग्राहक मोठ्या प्रमाणात आहेत. अनेकांकडे चिठ्ठी नसते, कुणी मोबाईलवर चिठ्ठी आणलेली असते, कुणी नुसतेच आपल्याच हस्ताक्षरात लिहून आणलेला कागद दाखवून तर काही जण चक्क तोंडीच गोळ्यांचे नाव सांगतात. व्यवसायासाठी अनेक दुकानदार नाईलाजास्तव तयार होतात.
पंचवटी
पंचवटीतही अनेक दुकानांमध्ये शहरातील ग्राहकांबरोबरच परराज्यांतून नाशिक दर्शनासाठी आलेले ग्राहकदेखील चिठ्ठीविनाच येतात. त्यांची गरजदेखील तातडीची असते. अशावेळी दुकानदारदेखील भूतदयेने तसेच व्यवसायासाठी संबंधितांना औषधे देतो. तर अनेक गोरगरीब नागरिकांनादेखील डॉक्टरांकडे जाणे परवडणारे नसते, त्यामुळेच ते थेट दुकानदारांकडे येतात, असा त्यांचा दावा असतो.
अन्न आणि औषध प्रशासन म्हणते...
डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कुठल्याही प्रकारच्या औषधांची व बिलाशिवाय औषध विक्री विक्रेत्यांनी करू नये, अशा सूचना दुकानदारांना सातत्याने दिल्या जातात. तसेच चिठ्ठीशिवाय औषधविक्री आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याबाबतचे निर्देशही निरीक्षकांना देण्यात आले आहेत. तसेच नागरिकांनीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व चिठ्ठीशिवाय उपचार घेऊ नयेत.
दुष्यंत भामरे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग