नाशिक : मद्यधुंद शिकाऊ पोलीस वाहनचालकाने भरधाव वेगाने पोलीस जीप चालवित जुने नाशिकमधील फुले मंडई येथे येथे उभ्या असलेल्या रिक्षांना धडक दिल्याची घटना बुधवारी (दि.३) रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी वाहनचालक पोलीस शिपाई पोपट साहेबराव ठोंबरे (२५), नियमित वाहनचालक निखिल साळवे, गणेश दिवे या तिघांना पहाटे भद्रकाली पोलिसांनी शहरातून अटक केली आहे.शहीद अब्दुल हमीद चौकातून भोजनाचे पार्सल घेण्यापूर्वी मद्यपान करत पोलिसांनी जीप (एम.एच १५ अेअे ३०९४) सारडा सर्कलकडे दामटविली. यावेळी नियमित वाहनचालक साळवेऐवजी स्टेअरिंग शिकाऊ वाहनचालक ठोंबरेने हाती घेतले होते. काही मीटर अंतरावर जीप चालवित नेत नाही तोच चालकाचा वाहनावरील आणि स्वत:वरील ताबा सुटला. जीप थेट मंडईच्या रिक्षा थांब्यावर उभ्या असलेल्या रिक्षांवर जाऊन आदळली. या अपघातात एक रिक्षाचालक जखमी झाला होता, तर चारही रिक्षांचे नुकसान झाले असून तीन रिक्षा या नवीनच आहे. अपघातानंतर परिसरात युवकांचा मोठा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता; मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्रभरातूनच तपास करत तातडीने संबंधित पोलीस जीपमधील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर मद्यप्राशन करत अंधाधुंदपणे वाहन चालविणे व अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तांबे यांनी याप्रकरणी सर्व तपास पूर्ण करत कारवाईचा अहवाल सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्याकडे पाठविला असून, भुजबळ यांनीही विभागनिहाय चौकशी करून अहवाल उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठविला आहे. अपघाताच्या वेळी वाहनात मद्याच्या बाटल्या आढळून आल्यामुळे नागरिकांचा रोष अधिक वाढला होता. सदर पोलीस कर्मचारी पोलीस मुख्यालयातील असून, वाहन विभागाची जीप बंदोबस्तासाठी घेतली होती. (प्रतिनिधी)
मद्यधुंद पोलीस वाहनचालकाला अटक
By admin | Published: August 05, 2016 2:01 AM