नाशिक: घरगुती कौटुंबिक भांडण करत पायाला जखम करून घेत पोलिस ठाण्यात आलेल्या एका रक्तबंबाळ युवकाला उपचारासाठी इंदिरानगर येथील पोलिसांनी माणुसकीच्या नात्याने पोलिस वाहनात बसवून जिल्हा रूग्णालयाच्या दिशेने प्रवास सुरू केला; मात्र या नशेबाज जखमी युवकाने सिगारेट पाजण्याची मागणी केली, त्यास नकार दिल्याने त्याने दोघा पोलिसांना वाहनातच मारहाण करण्यास सुरूवात केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
इंदिरानगर पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.४) संशयित मुज्जफर उर्फ मुज्जु सुलतान कुरेशी (३६,रा.घरकुल वसाहत, वडाळा) हा कौटुंबिक भांडणातून जखमी होऊन इंदिरानगर पोलिस ठाण्यात आला. तेथे त्याने मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातला. यावेळी त्याचा पाय रक्तबंबाळ झाल्याने संपुर्ण पोलिस ठाण्यात रक्ताचा सडा पडला हाेता. यामुळे त्याच्यावर औषधोपचार करण्यासाठी जिल्हा रूग्णालयात पोलिस घेऊन जात होते. सहायक पोलीस निरिक्षक एस.एम.साळी, पोलीस नाईक नितीनचंद्र गौतम, वाहनचालक निवृत्ती माळी आणि हवालदार मुकेश ढवळे हे त्याला घेऊन रूग्णालयाच्या दिशेने निघाले. यावेळी त्याने वाटेत पोलिसांकडे सिगारेटची मागणी केली.
त्यांनी नकार दिल्यानंतर मु्ज्जु याने वाहन थांबवून सिगारे पाजा, असे सांगून गोंधळ घालण्यास सुरूवीात केली. पोलिसांनी असमर्थता दर्शविल्याने त्याचा राग मनात धरून त्याने शेजारी बसलेल्या गौतम यांच्या पाठीमागून उजव्या हाताने ताकत लावून गळा कवळीत धरून आवळला. यामुळे त्यांचा श्वास रोखला गेला ढवळे यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांच्याही छातीत जोरदार ठोशा मारला. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. यामुळे वाहनचालकाने या दोघांना जवळच्या एका खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आला. दोघांची प्रकृती स्थिर असून गौतम यांनी दिलेल्या फिंर्यादीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात संशयित मुज्जुविरूद्ध शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.