लोकमत न्यूज नेटवर्कदेवळा : वाजगाव येथे दारूबंदी करण्याचे ग्रामस्थांचे सर्व प्रयत्न फोल ठरले असून, गावातील युवक, तसेच किशोरवयीन मुले मोठ्या प्रमाणात दारूच्या आहारी जात असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. देवळा पोलिसांनी यात लक्ष घालून गावात सर्रास उपलब्ध होणाऱ्या अवैध गावठी व देशी दारूचा बंदोबस्त करण्याची मागणी करतानाच दारूबंदीचा ठराव वाजगाव येथे झालेल्या ग्रामसभेत करण्यात आला.येथील मारुती मंदिरात झालेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रकाश मोहन होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या नूतन आहेर उपस्थित होत्या. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. कोलते शिवारात बिबट्या आढळल्यामुळे मोठी दहशत पसरली आहे. वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी अमोल देवरे यांनी केली. कोलते शिवारात सिंगल फेज सुरू करण्याची मागणीही करण्यात आली. व्यसनाधिनतेमुळे आतापर्यंत गावातील काही अल्पवयीन तरुण मृत्युमुखी पडले असून, त्यांचे संसार उघड्यावर पडल्यामुळे ग्रामसभेत चिंता व्यक्त करण्यात आली. गत दहा वर्षांत झालेल्या ग्रामसभांमध्ये ग्रामस्थांनी अनेक वेळा गावात दारूबंदी करण्याचे ठराव केले, तसेच देवळा पोलीस स्टेशनला ग्रामसभेचे ठराव, व ग्रामस्थांनी निवेदने देखील दिलीआहेत, परंतु यावर अद्यापपर्यंत ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे गावात दारूबंदी करण्याचा ठराव करण्यात आला. ग्रामसभेस उपसरपंच दीपक देवरे, संजय गायकवाड, विनोद देवरे, दिनेश देवरे, राजेंद्र केदारे, अमोल देवरे, पोपट निरभवणे, भाऊसाहेब नांदगे, ग्रामसेवक जे. व्ही. देवरे, आरोग्य सेवक पी. व्ही. सोनवणे, श्रीमती एम. एस. पगार, जनमित्र पी. के. आवारे, एस. व्ही. मोरे आदी उपस्थित होते.काही ग्रामस्थांकडूनच संरक्षण !गावात जिल्हा परिषदेंतर्गत पंचायत समितीच्या शिक्षण, आरोग्य व ग्रामपंचायत आदी विभागाचे १५ कर्मचारी कार्यरत आहेत. हे कर्मचारी नोकरीच्या ठिकाणी राहत नाहीत. ग्रामसभेत यावर साधकबाधक चर्चा झाली. दीपक देवरे यांनी कर्मचाऱ्यांनी गावात रहावे अशी सूचना केली. याचबरोबर शेतीकामासाठी मजूर टंचाईमुळे गावातील काही शेतकरी गावठी दारू विक्रेत्यांना दारूच्या भट्ट्या टाकण्यासाठी त्यांच्या शेतात जागा देतात, त्यांना संरक्षण देतात व त्या बदल्यात शेतीकामासाठी मजुरांची पूर्तता करून घेत असल्यामुळे गावात दारूबंदी करण्यात मोठी अडचण निर्माण होत असल्याची तक्र ार ग्रामस्थांनी केली.
वाजगावच्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 1:05 AM
देवळा : वाजगाव येथे दारूबंदी करण्याचे ग्रामस्थांचे सर्व प्रयत्न फोल ठरले असून, गावातील युवक, तसेच किशोरवयीन मुले मोठ्या प्रमाणात दारूच्या आहारी जात असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. देवळा पोलिसांनी यात लक्ष घालून गावात सर्रास उपलब्ध होणाऱ्या अवैध गावठी व देशी दारूचा बंदोबस्त करण्याची मागणी करतानाच दारूबंदीचा ठराव वाजगाव येथे झालेल्या ग्रामसभेत करण्यात आला.
ठळक मुद्देचिंता व्यक्त : दारूअड्ड्यांवर कारवाईची मागणी, देवळा पोलिसांचे दुर्लक्ष