नाशिक : ‘ड्राय डे’च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विक्रीसाठी आणला जात असलेला दमण निर्मित व केवळ दादरा नगरहवेली येथे विक्रीसाठी परवानगी असलेला सुमारे चार लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे़ मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारातील हॉटेल नटखट परिसरात फोर्ड फिएस्टा कारमधून या मद्याची वाहतूक केली जात होती़राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात ड्राय डे पाळला जातो़ या दिवशी मद्यविक्री बंद असल्याने आर्थिक फायद्यासाठी दमणनिर्मित मद्य शहरात आणले जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकास मिळाली होती़ त्यानुसार मुंबई-आग्रा महामार्गावर सापळा लावण्यात आला होता़ आडगाव शिवारातील हॉटेल नटखट परिसरात संशयास्पद फोर्ड फिएस्टा कारचा (एमएच १२, एचएल ४९१८) चालक संशयित रवींद्र्र दिलीपराव पगार यास ताब्यात घेऊन कारची तपासणी केली़या कारमध्ये ७५० व १८० मिलीच्या ब्लेंन्डर प्राईड , रॉयल चॅलेंज, मॅकडॉवेल, मॅक्युनटोश सिल्व्हर एडिएशन, रॉयल स्टॅग व्हिस्की, ट्युबर्ग बिअर व कार असा सुमारे ३ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ उपायुक्त प्रसाद सुर्वे व निरीक्षक एम. बी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक योगेश सावखेडकर, जवान कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दीपक आव्हाड, विठ्ठल हाके, सोमनाथ भांगरे व महिला जवान वंदना मरकड, सोनाली वाघमोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली़
‘ड्राय डे’ला मद्याची वाहतूक; मोटार जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 11:47 PM