विल्होळी : वाढत्या उन्हामुळे व पाण्याच्या अतिवापरामुळे यंदा प्रथमच गावाला पाणीपुरवठा करणारा विल्होळी बंधारा आटला असून, पंधरा दिवसांत पाऊस न आल्यास विल्होळीकरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. विल्होळी व परिसरात पाणीपुरवठा करणारे विल्होळी बंधाऱ्यातील पाणी झपाट्याने कमी होऊ लागल्याने ग्रामपंचायतीस आठवड्यातून दोन दिवस पाणी कपातीची वेळ आली असून, बंधाºयावर बसविण्यात आलेले कृषिपंप तत्काळ काढून घेण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.
विल्होळी व परिसराला पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनासाठी पाणीपुरवठा करणा-या विल्होळी बंधा-याची पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊ लागली असून, उष्णतेचे वाढलेले तापमान व त्यातच या बंधा-यातून वारेमाप होणारा उपसा पाहता, आगामी पंधरा दिवसांपुरताच पाणी साठा पुरण्याची चिन्हे आहेत. या बंधा-यातून शेतीसाठीदेखील मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जातो. त्यामुळे हा उपसा असाच सुरू राहिल्यास बंधारा कोरडाठाक पडेल. त्याला पर्याय म्हणून पाणीपुरवठ्याची कोणतीही सोय वा व्यवस्था नसून तसे झाल्यास विल्होळीकरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे या बंधा-यातून पाणी घेणा-या शेतकऱ्यांनी आपले कृषिपंप ताबडतोब काढून घ्यावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. त्याला काही शेतक-यांनी तत्काळ प्रतिसादही दिला असून, अनेकांनी ते काढण्याची कार्यवाही सुरू केली आहे. सध्याच्या वाढत्या उन्हामुळे जनावरांना मुबलक चारा, पाणी मिळत नसल्याने दररोज १२ ते १५ लिटर दूध देणारी जनावरे पाच ते सहा लिटरवर आल्याने दुधाच्या भावामध्ये वाढ झाली आहे. काही जनावरे धरणांमध्ये पाणी मिळत नसल्याने धोका पत्करून दलदलीसारख्या भागात उतरून पाण्याचा शोध घेत असल्याचे चित्र आहे. विल्होळी व परिसर हा नाशिक शहराच्या लगत असल्याने या ठिकाणी दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. उन्हाच्या दाहकतेने परिसरात चाºयाची कमतरता भासत असल्यामुळे शेतकºयांनी चारा छावणीची मागणी केली आहे.