आठवडाभरापासून दाटून येणारे ढग नाशिककरांना हुलकावणी देत होते. सोमवारी (दि.२०) दुपारच्या सुमारास शहरासह उपनगरांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ७ मिलिमीटर पावसाची नोंद पेठरोडवरील हवामान केंद्राने केली आहे.पावसाचे आगमन लांबल्यामुळे बळीराजासह अवघी सृष्टी हवालदिल झाली आहे. कोकण किनारपट्टीवरून राज्यात दाखल होणारा मान्सून यंदा थेट विदर्भमार्गे आला. रविवारी विदर्भासह मुंबई व कोकणात पावसाने दमदार हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रात पावसाचे आगमन दमदार झाले असले तरी उत्तर महाराष्ट्राला जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. सोमवारी दुपारी साडेतीन वाजता शहरात सुमारे अर्धा तास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने रस्ते ओले झाले होते. दरम्यान, तरुणाईने पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद लुटला. पावसाच्या सरी या खूप दमदार नसल्या तरी शिडकाव्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून, पावसाला सुरुवात झाल्याने नाशिककर आनंदी झाले आहेत.
पावसाच्या शिडकाव्याने दिलासा
By admin | Published: June 20, 2016 11:34 PM