नाशिक : ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन नाशिकमध्येही आढळून आल्याने संपूर्ण यंत्रणेला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. ब्रिटनबरोबरच दुबईसह अन्य तीन देशांमध्ये आढळणारे स्ट्रेन्स नाशिकमधील रूग्णांमध्ये आढळल्याने चिंता वाढली आहे. हा नवीन विषाणू काेरोनापेक्षा अधिक वेगाने फैलावणारा आणि शरीरावर व्यापक परिणाम करणारा असल्याचे सांगितले जाते. प्रशासनाने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन प्रयोगशाळेकडे पाठवलेल्या २६ नमुन्यांपैकी ३० टक्के नमुन्यांमध्ये दुबई आणि ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे. कोरोना विषाणूचा हा नवा स्ट्रेन झपाट्याने पसरत असून, त्यामध्ये रूग्णवाढीचा वेग अधिक आहे. यामध्ये जीविताचा धोका कमी असला, तरी विषाणू पसरण्याचा धोका चारपट अधिक असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.प्रत्येकाने निर्बंधाचे पालन करावे असे आवाहन करून जिल्ह्यात कठोर कारवाई करण्याची सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. जिल्ह्यात सध्या १०,८५१ ॲक्टिव्ह रूग्ण असून, त्यापैकी ८० टक्के रूग्ण हे महापालिका क्षेत्रात आहेत तर १८ टक्के रूग्ण ग्रामीण भागात आहेत.
ठाण्यातही नवा स्ट्रेन- मूळच्या ठाणे शहरातील आणि कार्यालयीन कामानिमित्त गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या एका व्यक्तीत कोरोनाचा नवीन स्ट्रेन असल्याचा अहवाल पुणे प्रयोगशाळेने दिला. दरम्यान, ती व्यक्ती कोरोनाग्रस्त होऊन आता पूर्णपणे बरीही झाली आहे. - त्या व्यक्तीच्या जवळच्या संपर्कात आलेले दोन स्थानिक नागरिकही आता पूर्णपणे बरे झाले आहेत. ठाणे येथील ती व्यक्ती २५ दिवसांपूर्वी सरकारी कामानिमित्त आलापल्ली येथे आली होती. - आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आल्याने गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या संपर्कातील आलापल्ली येथील दोन व्यक्तीही पॉझिटिव्ह होत्या. सर्वजण उपचारानंतर घरीही गेले. आरोग्य विभागाने त्यांचा नमुना पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविला होता. त्याचा अहवाल आता आला असून, ठाणे येथून आलेल्या त्या व्यक्तीच्या नमुन्यात इंग्लंडमधील कोरोनाचा नवीन विषाणू आढळून आला आहे. आरोग्य विभागाने याला दुजोरा दिला आहे.
सोलापूर उच्चांकी ३११ रुग्णजिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. पाच जणांचा मृत्यू झाला असून नव्याने ३११ रुग्ण आढळून आल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. गेल्या चार महिन्यातील हा उच्चांक आहे. महापालिका हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत.
साताऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी तीनशेपार सातारा जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा कहर सुरू केला असून, सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी कोरोनाचे ३०३ रुग्ण आढळले. त्यामुळे बाधितांची संख्या ६१ हजार ६३५ वर पोहोचली आहे. बुधवारी दिवसभरात ३०८ रुग्ण आढळले होते. लसीचा वेग आणखी वाढवून दिवसाला २५ हजार जणांना लस देण्याची सुविधा तयार करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू झाले आहे.रुग्ण वाढल्याने पुण्यात १५ दिवसांसाठी निर्बंधकोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने शहरात १५ दिवसांसाठी कठोर निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. तसेच दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे प्रशासनाने जाहीर केले आहे. मात्र, नागरिकांकडून निर्बंधांचे प्रभावी पालन होत नसल्याचे दिसून येते. विवाह समारंभात जास्त उपस्थिती असल्याने एका मंगल कार्यालयावर पोलिसांनी कारवाई केली.
विदर्भात दिवसभरात विक्रमी ६,६९६ रुग्ण नागपूर गत पाच दिवसांप्रमाणे गुरुवारीदेखील विदर्भात दैनंदिन रुग्णसंख्येने नवा विक्रम गाठला. २४ तासांत ६ हजार ६९६ नवे रुग्ण आढळले, तर ४६ रुग्णांचा मृत्यू झाला. २४ तासांत रुग्णसंख्येत ४३१ ने वाढ झाली असून, मृत्युसंख्या दोनने वाढली आहे. रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ९३ हजार ६४८ इतकी झाली आहे. नागपुरात तर बुधवारहून अधिक रुग्णांची नोंद झाली.