घोटी : अकोले आगाराची कसारा जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस गुरुवारी सकाळी ब्रेक निकामी झाल्याने तसेच तांत्रिक बिघाड झाल्याने बारी घाटातल्या दरीत गेली. बसचे पुढील बंपर तुटल्याने बस सुमारे दीड हजारहून अधिक खोल दरीत कोसळण्यापासून वाचली. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखल्याने बसमधील चाळीस प्रवाशांचे प्राण वाचले. यात बारा प्रवासी जखमी झाले.अकोल्याहून कसाऱ्याकडे जाणारी बस (एमएच १४ बीटी ११५४) सकाळी साडेआठ वाजता आगारातून निघाली. बसचालक मच्छिंद्र घोडके व वाहक वर्पे हे चाळीस प्रवासी घेऊन सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास बारी घाटातून येत असताना रस्त्यावरील एका खड्ड्यात आदळल्यामुळे बसमध्ये तांत्रिक बिघाड होऊन बसचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे बस उजव्या बाजूला खोल दरीत गेली. दरम्यान, बसने रस्ता सोडल्यामुळे बस खड्ड्यांमध्ये आदळत असल्याने पुढील काही साहित्य तुटून ते जमिनीत रोवल्यामुळे बस खोल दरीच्या अवघ्या काही फुटांवर थांबविण्यात चालकाला यश आले. यामुळे सुदैवाने बसमधील चाळीस प्रवाशांचे प्राण वाचले. यात चालकासह बारा प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, जखमी प्रवाशांना उपचारार्थ अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच घोटीचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्यासह उपनिरीक्षक कमलेश बच्छाव, हवालदार नितीन भालेराव, चारोस्कर आदिंनी धाव घेऊन जखमींना उपचारार्थ रुग्णालयात हलविले. (वार्ताहर)
ब्रेक निकामी झाल्याने बस दरीत
By admin | Published: July 21, 2016 11:21 PM