नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फ त घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र पुरवणी परीक्षांमध्ये नाशिक जिल्हा कॉपीमुक्त झाला आहे. नाशिक विभागीय मंडळाने राबविलेल्या कॉपीमुक्त अभियानामुळे नाशिक जिल्ह्यातील मार्च, फेब्रुवारीच्या परीक्षेतही कॉपी प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली असून, पुरवणी परीक्षेत हे प्रमाण शून्यावर आणण्यात नाशिक विभागीय मंडळाला यश आहे. नाशिक जिल्हा संपूर्ण कॉपीमुक्त झाल्यानंतर विभागीय शिक्षण मंडळाने आता नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्हेही कॉपीमुक्त करण्याच्या दिशेने नाशिक विभागीय मंडळाने वाटचाल सुरू केली आहे. नाशिक विभागात यावर्षी पुरवणी परीक्षेत संपूर्ण विभागात एकही कॉपी प्रकरण आढळून आले नाही, तर बारावीच्या पुरवणी परीक्षेत आतापर्यंत केवळ ९ कॉपीची प्रकरणे समोर आली असून, ही सर्व प्रकरणे एकट्या जळगाव जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे जळगाव वगळता विभागातील नाशिक, नंदुरबार व धुळे जिल्हे संपूर्ण कॉपीमुक्त करण्यात नाशिक विभागीय मंडळाला यश आहे. नाशिक विभागात यावर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत १३२, तर बारावीच्या परीक्षेत २२४ कॉपीची प्रकरणे समोर आली होती. गेल्या चार पाच वर्षांच्या तुलनेत या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असून, पुरवणी परीक्षेत जळगावचा अपवाद वगळता नाशिक विभाग कॉपीमुक्त करण्यात विभागीय शिक्षण मंडळाला यश आले आहे.
अभियानामुळे दहावीची पुरवणी परीक्षा कॉपीमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 12:43 AM