नाशिक- उंबरमाळ येथे रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वेची सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे नाशिकहून जाणाऱ्या रेल्वे मध्येच थांबवण्यात आल्या. पंचवटी एक्सप्रेस देवळाली येथे तीन तास थांबल्याने संतप्त प्रवाशांनी रेल्वेच्या अधिका-यांना धारेवर धरले. नंतर ही रेल्वे केवळ इगतपूरीपर्यंत पाठविण्यात आली आहे.
नाशिक शहरातून प्रामुख्याने मुंबईस नोकरीस जाणारे चाकरमाने पंचवटी एक्सप्रेसचा उपयोग करतात. सकाळी नेहेमीप्रमाणे रेल्वे सुरू झाली खरी परंतु नंतर मात्र ती देवळाली रेल्वेस्थानकात थांबवून ठेवण्यात आली. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. कसाºयाजवळ तांत्रिक बिघाड सुरू असल्याने रेल्वे काही वेळाने निघेल असे सांगण्यात आल्यांने सुरूवातीला प्रवाशांनी धीर धरला. मात्र नंतर तास दीड तास झाल्यानंतर देखील रेल्वेचे अधिकारी रेल्वे कधी सुरू होणार आणि ती मुंबईस पोहोचणार की नाही याबाबत समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे अधिकाºयांना जाब विचारला. रेल्वे सेवा ठप्प आहे. हे रेल्वेप्रशासनानाला माहिती असतानाच देखील त्यांनी पंचवटी एक्सप्रेस नाशिकरोडहून का सोडली याचे उत्तर अधिकारी देऊ शकले नाहीत. त्यातच अनेक प्रवाशांनी पैसे मागितले. परंतु त्याबाबतही अधिकारी निर्णय घेऊ शकले नाहीत. रेल्वे कधी सुरू होणार की रद्द होणार याबाबत मुंबई किंवा भूसावळ डीव्हीजनचे अधिकारी निर्णय घेतील असे सांगून अधिका-यांनी माहिती देण्यास टाळल्याने प्रवाशांनी टाळाटाळ केल्याने प्रवाशांच्या संतापात भर पडली.
दरम्यान, तीन तासानंतर पंचवटी एक्सप्रेस सुरू झाली परंतु इगतपुरीपर्यंतच पाठविण्यात आली. तेथून नागरीकांनी अन्य वाहनांनी मुंबई आणि नाशिक गाठले.