नाशिक : औरंगाबाद जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा व कर्जतचे उपजिल्हाधिकारी अभय करगुटकर यांना शासकीय काम करीत असताना लोकप्रतिनिधींकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शनिवारी महसूल कर्मचारी, अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्याने त्याचा परिणाम शासकीय कामकाजावर झाला. या संदर्भात नाशिकच्या दौऱ्यावर आलेले जलसंधारणमंत्री राम शिंदे यांना संघटनेने निवेदनही सादर केले. त्यात म्हटले आहे की, सध्या राज्यात शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षाचे पुढारी आणि तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांकडून मारहाण करणे, अर्वाच्य शब्दात शिवीगाळ करणे यासारख्या घटना रोज घडत आहेत. त्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचारी अक्षरश: स्वत:चा जीव मुठीत धरून काम करीत आहेत. त्याचा विपरीत परिणाम शासकीय कामकाजावर होत आहे. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अशा घटनांनी मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना मारहाण केलेल्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्वरित अटक करण्यात यावी तसेच यापुढे अशा घटना घडणार नाहीत म्हणून वचक राहण्याच्या दृष्टीने मारहाण करणाऱ्यांविरुद्धचे खटले फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर अपर जिल्हाधिकारी कान्हुुराज बगाटे, महसूल उपआयुक्त संजय कोलते, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, बाळासाहेब वाघचौरे, दीपमाला चौरे, नितीनकुमार मुंडे, मुकेश भोगे, विठ्ठल सोनवणे, राजेंद्र कचरे, संजय बागडे, मधुमती सरदेसाई-राठोड, उदय किसवे, गणेश राठोड, बाळासाहेब गाढवे, मंजूषा घाटगे, वैशाली हिंगे, पंकज पवार, प्रशांत कोरे, योगेश शिंदे आदिंच्या स्वाक्षरी आहेत. (प्रतिनिधी)
‘लेखणी बंद’मुळे महसूलचे कामकाज ठप्प
By admin | Published: August 21, 2016 1:49 AM