कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील ओणे येथील पुलाची दुरवस्था झाली असून, तुटलेल्या पुलावरून ग्रामस्थ व विद्यार्थी कसेबसे नदी पार करत आहेत. पूर आल्यानंतर तर गावाचाच संपर्कच तुटतो. जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागत असून, येथे नवीन पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.निफाड तालुक्यातील ओझर, सुकेणे, पिंपळस या मार्गावर असलेले ओणे येथील गावकरी बाणगंगा नदीवरील तुटलेल्या पुलावरून जीव जोखमीत घालून प्रवास करीत आहेत. ओझर-सुकेणेला जोडण्यासाठी बाणगंगा नदीवर छोटा पूल आहे. गेल्या वर्षी बाणगंगेला आलेल्या महापुरात सदर फरशीपूल वाहून गेला होता. त्यानंतर स्थानिक पातळीवर भराव टाकून डागडुजी करण्यात आली होती; परंतु यंदाच्या पावसाळ्यातील सलग तीन पुरांमुळे तात्पुरता टाकलेला भरावही वाहून गेला असून, सध्या ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, नोकरदारवर्ग आणि शेतकºयांचे अतोनात हाल होत आहेत. गेल्या आठवड्यात तब्बल तीन दिवस गावाचा संपर्क तुटला होता. परिणामी गावातून ओझर, सुकेणे, पिंपळगाव, नाशिक या भागात जाणाºया विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होतात. तसेच ओणे येथून पिंपळगाव, ओझर भागात शेतमाल विक्रीसाठी नेणे जिकिरीचे ठरत असून, सुकेणेमार्गे चार किलोमीटर अंतराचा फेरा मारून शेतकºयांना ओझर गाठावे लागत आहे. त्यामुळे शेतकºयांचा वेळ, पैशाचा अपव्यय होतो. जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद व लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकºयांनी केली आहे. ओणेकरांच्या गैरसोयींकडे लक्ष देऊन नवीन पूल मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या निफाड तालुक्यातील बाणगंगा काठ समस्याग्रस्त बनला आहे. नाशिक-सुकेणे शहर बससेवेचे कमी झालेले फेरे, ओझर-सुकेणे, मौजे सुकेणे-ओणे-खेरवाडी, कसबे सुकेणे-कोकणगाव, सुकेणे-चांदोरी, सुकेणे-निसाका, सुकेणे-पिंपळस या रस्त्यांची दुर्दशा, कसबे सुकेणे परिसरात सुरू असलेले अवैध धंदे, भरदिवसा होणाºया चोºया, बाणगंगाकाठची मुख्य बाजारपेठ असलेल्या कसबे सुकेणे शहरातील मेनरोड व हायस्कूल रस्त्याची झालेली वाताहत, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची अनुपस्थिती व त्यामुळे रुग्णांचे होणारे हाल अशा विविध समस्यांनी बाणगंगाकाठ ग्रासला आहे. रस्त्यांची दुर्दशा कधी थांबेल, असा सवाल कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, ओणे, थेरगाव, दात्याणे, जिव्हाळे, दीक्षी या भागातील जनतेने केला आहे.
बाणगंगा नदीवरील पूल खचल्याने धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 12:13 AM