लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : कोरोना महामारीच्या फेर्याने सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात उद्योग धंदे अडचणीत आले तर काही बंदही पडले. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री गणेश उत्सवावर कोरोनाचे संकट घोंगावत असल्याने मूर्तिकारांचा धंदाच मंदावला आहे. सलग दुसर्या वर्षी कोरोनाचा फटका मूर्तिकारांना झटका देणारा ठरत आहे. त्यामुळे सण उत्सवाशी संबंधित सर्वच व्यावसायिकांचे अर्थिक गणित यंदाही कोलमडणार असल्याचे चित्र आहे.
येवला शहरासह तालुक्यात कुंभार समाजासह इतरही उत्तर प्रदेश, राजस्थान येथून आलेले अनेक मूर्तिकार गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेशमूर्ती बनवत असतात. शहरासह ग्रामीण भागातही गणेशमूर्ती बनविण्याचे कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये साधारणत: गणेशोत्सवाच्या चार महिने आधीपासूनच गणेशमूर्ती बनविण्याची तयारी सुरू होते. त्यासाठी बाहेरून रंग, वाळू, माती आदी साहित्य आणले जाते. येवल्यातील गणेशमूर्तींना नाशिक, अहमदनगर, पुणे, मुंबई, सुरत, अहमदाबाद आदी जिल्ह्यात मोठी मागणी राहते. गतवर्षी प्रमाणेच यंदाही कोरोना प्रादूर्भावामुळे साहित्य उपलब्धतेची मोठी अडचण निर्माण झाली. याबरोबरच महागाईचाही फटका बसला आहे. तर कोरोनामुळे मूर्तींना बाहेरील मागणी नाही. परिणामी मूर्तिकारांचे या वर्षाचेही अर्थिक गणितच कोलमडणार असल्याचे चित्र आहे.
गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा अनेक सार्वजनिक मंडळांनी निर्णय घेतला होता. यावर्षीही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. यंदाही शासनाच्या अटी नियमांमुळे श्री गणेशमूर्तींच्या उंचीवर मर्यादा असून, उत्सवाच्या स्वरूपावरही मर्यादा राहतील.
गतवर्षीचा अनुभव पाहता यंदा बहुत्वांशी मूर्तिकारांनी दोन फुटांच्या आतील व छोट्या मूर्ती बनविण्यावर भर दिला आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेशमूर्तींचे दरही वाढलेले राहणार आहेत, तर गणेशोत्सवासंबंधित टी शर्ट, सजावट साहित्य आदींची विक्री करणार्या व्यावसायिकांना यंदाही कोरोनाचा फटका जाणवणार असल्याचे चित्र आहे.
कोट...
येवल्यातील गणेशमूर्तींना अहमदाबाद, मुंबई, पुणे, नाशिक, नगर, औरंगाबाद आदी जिल्ह्यांमध्ये मागणी असते. यंदा मात्र अजूनही कोरोनामुळे गणेशमूर्तींना बाहेरील मागणी नाही. गतवर्षाचा अनुभव पाहता यंदा लहान आकाराच्या मूर्ती बनविल्या आहेत. गणेशमूर्ती बनविण्यासाठी लागणारे साहित्य महागल्याने गणेशमूर्तींचे भाव यंदाही वाढलेले राहतील.
- अविनाश वर्मा, मूर्तिकार, येवला
110721\11nsk_27_11072021_13.jpg~110721\11nsk_28_11072021_13.jpg
मूर्तीकार~गणेशमूर्ती