रोहन वावधाने, मानोरी : गेल्या दोन वर्षांपासून थाटामाटात साजरा होणारा गणेशोत्सव सोहळा कोरोनाच्या विळख्यात सापडला असून, सलग दुसऱ्या वर्षीही गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे मूर्तिकारांनी गणरायच्या मूर्तिकामात हात आखडता घेतला आहे. मोठ्या प्रमाणात गणपतीच्या मूर्ती बनवूनही मागणी न आल्यास, माल तसाच पडून राहण्याची भीती मूर्तिकारांसह व्यावसायिकांमध्ये निर्माण झाली आहे.कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना, पुन्हा डेल्टा प्लस नावाच्या नव्या विषाणूने डोकेवर काढले असून, त्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यावर दुसऱ्या वर्षीही काही बंधने लादली जाणार काय व मोठ्या गणेशमूर्ती बनवाव्यात की नाही, अशी संभ्रमावस्था मूर्तिकारांमध्ये बघायला मिळत आहे. गणेशोत्सव अवघ्या दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपलेला आहे. कारागिरांमध्ये गणेशमूर्ती बनवण्याची लगबग सुरू झालेली आहे. मूर्ती बनविणारे कारागीर दरवर्षी मोठ्या गणेशमूर्ती बनवत असतात. मात्र, मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवावर बंधने लादली गेल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करून, घरगुती स्वरूपातील गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी मिळाली होती. घरगुती स्वरूपातल्या गणेशोत्सवासाठी दीड ते दोन फुटांपर्यंतच्या मूर्ती कारागिरांनी बनविल्या होत्या. या वर्षी कोरोनाचे सावट पुन्हा निर्माण झाल्याने मूर्तिकारांमध्ये संभ्रमावस्था आहे.गणेशमूर्ती बनविणाऱ्या कारागिरांनी घरातच स्थापन केल्या जाणाऱ्या साधरणतः दीड ते दोन फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती बनविण्यास सुरुवात केली आहे. मागील वर्षीही मोठ्या गणेशमूर्तींना परवानगी नसल्याने मूर्तिकारांना खूप मोठ्या आर्थिक फटक्याला तोंड द्यावे लागले होते. त्याप्रमाणेच, या वर्षी तेच संकट उद्भवण्याची भीती व्यक्त होताना दिसत आहे.गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे विघ्न असल्याने तयार केलेल्या गणपतीच्या मूर्तींना अल्प प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षीही सार्वजनिक गणेशोत्सवास परवानगी नसल्याने मोठ्या मूर्ती बनविल्या गेल्या नव्हत्या. त्यामुळे खूप मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होता. या वर्षीही सार्वजनिक गणेशोत्सवास परवानगी मिळेल की नाही, याची शाश्वती नसल्या कारणाने मोठ्या मूर्ती बनवाव्यात की नाही, अशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.- वाल्मिक रोकडे. मूर्तिकार, मुखेड.
कोरोनामुळे गणेश मूर्तिकामात हात आखडता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 12:09 AM
रोहन वावधाने, मानोरी : गेल्या दोन वर्षांपासून थाटामाटात साजरा होणारा गणेशोत्सव सोहळा कोरोनाच्या विळख्यात सापडला असून, सलग दुसऱ्या वर्षीही गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे मूर्तिकारांनी गणरायच्या मूर्तिकामात हात आखडता घेतला आहे. मोठ्या प्रमाणात गणपतीच्या मूर्ती बनवूनही मागणी न आल्यास, माल तसाच पडून राहण्याची भीती मूर्तिकारांसह व्यावसायिकांमध्ये निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देमूर्तिकार संभ्रमात : छोट्या मूर्ती तयार करण्यावर भर