राजापूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने लॉकडाउन व संचारबंदी लागू आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात दि. १५, १६, २६ व २७ या चार लग्न तिथी असूनही कोरोनामुळे लग्न सोहळे मात्र रद्द झाले आहेत. राजापूर व परिसरातील मंडळींनी लग्न सोहळे पुढे ढकलले आहेत.जमलेले लग्न व जमणार असलेल्या लग्नाच्या निमित्ताने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या नवरदेव-नवरींचा मात्र कोरोनामुळे लग्न लांबल्याने हिरमोड झाला आहे. वधू-वर पक्षाकडून लग्न कसे करणार यावर फोनवरून सध्या चर्चा होताना दिसत आहे. संचारबंदीने नवरीच्या गावाला जाता येईना अन् नवरदेवाच्या गावाला जाता येईना अशी स्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाउन, संचारबंदी १४ एप्रिलपर्यंत जाहीर झालेली असली तरी ती पुन्हा वाढण्याचीच चिन्हे असल्याने कोरोनाच्या भीतीपोटी कुणीही एप्रिल महिन्यातील लग्नतारखा धरण्यासाठी तयार नाही. कोरोनाने लग्नसराई लांबणीवर पडली असून याचा परिणाम लॉन्सचालक, मंडपवाले, वाजंत्रीवाले, आचारी, किराणा व्यापारी, फोटोग्राफर, गोंधळी आदी सर्वच घटकांवर जाणवू लागला आहे. कोरोनाने अनेकांचे रोजगारच ठप्प झाले आहे. तर हातावर पोट असणाऱ्या कारागिरांचे मात्र मोठे हाल होत आहेत.लग्न म्हणजे एक मोठा सोहळा असतो. दोन्हीकडच्या कुटुंबांमध्ये या निमित्ताने आनंदाला उधाण असते तर सामाजिक प्रतिष्ठेसाठी मोठा खर्चही केला जातो. एप्रिल बरोबरच येत्या मे महिन्यात लग्न तिथी असूनही वधू व वर पक्षाकडून दिवाळीनंतरच लग्नसोहळ्याचा विचार करू असे आश्वासन दिले जात असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.साखरपुडा झालेल्या नवदांपत्याला आता फोनवर बोलून दिवस मोजावे लागत आहेत तर नवीन लग्न जुळवाजुळवीही थांबली आहे. विवाह सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात कुलदैवतांचा जागर करण्याची प्रथा आहे. जागरण गोंधळ घालण्याचा सध्या सीझन असताना कोरोनाने मात्र जागरण गोंधळ घालणाºया कलाकारांवर उपासमारीची वेळ आणली आहे.
कोरोनामुळे लगीनसराई लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 10:37 PM
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने लॉकडाउन व संचारबंदी लागू आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात दि. १५, १६, २६ व २७ या चार लग्न तिथी असूनही कोरोनामुळे लग्न सोहळे मात्र रद्द झाले आहेत. राजापूर व परिसरातील मंडळींनी लग्न सोहळे पुढे ढकलले आहेत.
ठळक मुद्देयेवला परिसर : वधू-वर पक्षाने सोहळे केले स्थगित