नाशिक- शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या तीनशे पार केल्याने शहरात चिंतेचे वातावरण असले तरी प्रत्यक्षात मात्र, नऊ रूग्णांवरच खऱ्या अर्थाने गांभिर्याने उपचार सुरू आहेत. १६ रूग्णांना प्राणवायु पुरवला असून तीन रूग्णांवर जीव रक्षक प्रणालीव्दारे उपचार सुरू असल्याची माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शुक्रवारी (दि.५) दिली. महापालिकेने बाधीतांच्या संपर्कातील नागरीक शोधून त्यांचे नमुने घेण्यास प्रारंभ केल्याने उलट वेळेत रूग्ण आढळत असल्याने उपचार आणि निराकरण करणे देखील सोपे जात आहेत, त्यामुळे रूग्ण संख्येत वाढ झाल्याने काळजीचे कारण नाही असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
शहरात सुरवातीला कोरोनाबाधीतांची संख्या मर्यादीत होती. नंतर ती वाढली आहे. आता तर मृतांची संख्या १३ झाली असून बाधीतांची संख्या जवळपास सव्वा तीनशे इतकी झाली आहे. सध्या शहरात मालेगाव पेक्षा अधिक संख्येने बाधीत उपचार घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरात चिंता व्यक्त केली जात असली तरी आयुक्तांनी सांगितले की, एखाद्या भागात बाधीत आढळल्यानंतर त्या रूग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन तातडीने नमुने घेतले जातात आणि प्रयोगशाळेत पाठविले जातात. त्यामुळे उलट महापालिका संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात धरून अगोदरच या व्यक्तींना कोरंटाईन करण्यात आले आहे.त्यामुळे ही जमेची बाब आहे. अर्थात सध्या जितके रूग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी दहा टक्के रूग्णांना देखील जीव रक्षक प्रणाली लावावी लागलेली नाही. प्राथमिक लक्षणे असतील तर संबंधीत संशयितांना घरीच ठेवा असे शासनाचे आदेश आहे. मात्र, त्यानंतर देखील महापालिका संबंधीतांन विलगीकरण कक्षात ठेवून उपचार करीत असल्याचे आयुक्तांनी सागिंतले.
सध्या महापालिकेने दाट वस्तीत कोरोना बाधीत आढळल्यानंतर त्याकडे विशे लक्ष पुरवण्याची भूमिका घेतली आहे. एकदा एखाद्या रूग्णाचा अहवाल पॉझीटीव्ह आला आणि नंतर चार दिवस काहीच त्रास झाला नाही तर संबंधीत रूग्णाला घरी पाठविण्याची देखील शासनाच्या नियमात तरतूद आहे. मात्र, तरीही दाट वस्तीतील रूग्णांना तत्काळ सोडले जात नाही. विशेषत: झोपडपट्टी भागात विलगीकरणाची सोय नसते. घरात वेगळे प्रसाधन गृह नसते अशा रूग्णांना लवकर डिस्चार्च दिला जात नसल्याचेही गमे म्हणाले.