नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत पक्षातून दोघा जिल्हा परिषद सदस्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याच्या माकपाच्या कारवाईचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, माकपाचे गटनेते रमेश बरफ यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. नाशिक महापालिकेत पक्षबदल करणाऱ्या माकपाच्या दोघा नगरसेवकांविरोधात पक्षाने विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल करीत त्यांचे नगरसेवक पद अपात्र ठरविण्याची मागणी केली होती. तांत्रिकदृष्ट्या ही मागणी रास्त असल्याने दोघा नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली. त्याउलट जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाची तटस्थ राहण्याची भूमिका असताना आणि तसा पक्षादेश (व्हीप) बजावला असताना दोन सदस्य अनिता बोडके व ज्योती जाधव यांनी पक्षविरोधी भूमिका घेत शिवसेना व कॉँग्रेसला मतदान केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्याऐवजी माकपाने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. तांत्रिकदृष्ट्या हा निर्णय पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांच्याच हिताचा असल्याची चर्चा आहे. दोन तृतीयांश म्हणजे ३ पैकी २ सदस्य फुटल्याने पक्षविरोधी कायद्यांतर्गत या दोघा सदस्यांवर कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. याउलट या दोघा सदस्यांची पक्षातून हकालपट्टी करीत त्यांना आगामी विषय समिती निवडणुकांमध्ये नेमकी काय भूमिका घ्यायची यासाठी एकप्रकारे मोकळीकच दिल्याचा राजकीय तज्ञ्जांचा व्होरा आहे. त्यामुळे एकूणच माकपाचा हा दोन सदस्यांच्या हकालपट्टीचा निर्णय तसा आश्चर्यकारक मानला जात आहे. (प्रतिनिधी)
माकपाच्या भूमिकेने आश्चर्य, अपात्रतेऐवजी हकालपट्टी
By admin | Published: March 23, 2017 1:35 AM