नाशिक : येथील येवला तालुक्यातील ममदापूर राखीव संवर्धन राखीव जंगलाचे क्षेत्र काळविटांसाठी प्रसिध्द आहे. काळविट अभयारण्य असलेल्या या संवर्धन क्षेत्रातील एका हरीण शनिवारी (दि.४) खरवंडी-कोळम खूर्द चौफूलीजवळ मृतावस्थेत आढळून आले होते. गावकर्याच्या म्हणण्यानुसार या हरणाची गोळ्या घालून शिकार करण्यात आली होती; मात्र या हरणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेहामध्ये कुठल्याही प्रकारची गोळी आढळून आली नसल्याचा अहवाल पशु वैद्यकिय अधिका-यांनी दिला आहे. यामुळे हरणाची शिकार झाली नसल्याचा दावा वनविभागाच्या अधिका-यांकडून करण्यात आला आहे. हरीण संवर्धन राखील क्षेत्रातून बाहेर भरकटल्यावर मोकाट कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केलेला असावा, असे वनविभागाचे म्हणणे आहे. कारण शवविच्छेदनामध्ये दातांच्या खूणा आढळून आल्या. पहाटेपासून मृतदेह पडून असल्याने निम्म्याहून अधिक मृतदेह नष्ट झालेला होता. याबाबत पुढील तपास सुरू असून शिका-यांची पाळेमुळे शोधून काढत त्यांच्यावर वनविभागाचे गस्त पथक लक्ष ठेवून असल्याची माहिती सहायक वनसंरक्षक राजेंद्र कापसे यांनी दिली आहे.नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील ममदापूर वनसंवर्धन राखीव क्षेत्र काळविटांच्या वास्तव्यासाठी ओळखले जाते. सुमारे पाच हजार हेक्टरवर पसरलेल्या या राखीव क्षेत्रात मोठ्या संख्येने हरणांचे संवर्धन होत आहे. नाशिक पुर्व वनविभागाच्या अखत्यारितीत हा परिसर आहे. स्थानिक गावांमधील गावक-यांच्या मदतीने या भागाची सुरक्षितता वनविभागाकडून अधिकाधिक वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुरेसे मुबलक साहित्य व सामुग्री आणि मनुष्यबळ ममदापूरसाठी स्वतंत्ररित्या देण्याची गरज आहे.मृतावस्थेत आढळून आलेल्या हरणाच्या मृतदेहामध्ये बंदूकीची गोळी आढळून आली नसली तरी बंदूकीतून गोळ्या झाडल्या गेल्या त्या आवाजाने गावकरी जागे झाले असा दावा ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. खरवंडी कोळम गावाचा परिसर निर्जन असल्यामुळे शिकारीचा प्रयत्न झाला असण्याची शक्यता वनविभागाने नाकारली नसून त्या दिशेनेही तपास सुरू असल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे. यापुर्वी देखील हरणाची शिकार करताना एका आरोपीला गावक-यांच्या मदतीने पकडण्यात वनविभागाला यश आले होते.
नाशिकच्या ममदापूर काळविट राखीव संवर्धन क्षेत्रातील ‘त्या’ हरणाचा कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 4:39 PM
खरवंडी-कोळम खूर्द चौफूलीजवळ मृतावस्थेत आढळून आले होते. गावकर्याच्या म्हणण्यानुसार या हरणाची गोळ्या घालून शिकार करण्यात आली होती; मात्र या हरणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेहामध्ये कुठल्याही प्रकारची गोळी आढळून आली नसल्याचा अहवाल पशु वैद्यकिय अधिका-यांनी दिला आहे.
ठळक मुद्दे शवविच्छेदनामध्ये दातांच्या खूणा आढळून आल्या ममदापूर वनसंवर्धन राखीव क्षेत्र काळविटांच्या वास्तव्यासाठी ओळखले जाते. पुरेसे मुबलक साहित्य व सामुग्री आणि मनुष्यबळ ममदापूरसाठी स्वतंत्ररित्या देण्याची गरज