- प्रसाद जोशी नाशिक : माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी १९ जुलै, १९६९ रोजी देशातील प्रमुख १४ बॅँकांचे राष्टियीकरण केले, त्याला रविवारी ५१ वर्षे पूर्ण होत आहेत. या अर्धशतकाहून अधिक कालावधीमध्ये देशातील अगदी लहान खेड्यांमध्ये बॅँकिंग व्यवस्था पोहोचली असून सर्वसामान्यांनाही बॅँकेमध्ये खाते उघडता येत आहे. आता मात्र राष्ट्रीयीकरणाकडून बँकांच्या विलीनीकरणाकडे वाटचाल सुरू आहे.
मोठ्या बँकांची निर्मिती
सरकारने कालांतराने आणखी बॅँकांचे राष्ट्रीयीकरण करीत त्यांची संख्या २६ पर्यंत नेली. आता बदलत्या वातावरणात आंतरराष्ट्रीय स्पर्धेला तोंड देण्यास आपल्या बँकादेखील सक्षम व्हाव्यात या हेतूने सरकारने बँकांचे विलीनीकरण आणि एकत्रीकरण सुरू केले असून, त्यामुळे राष्ट्रीकृत बॅँकांची संख्या १२ वर आली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत या बॅँकांनी सुमारे ५० बॅँकांना आपल्यात सामावून घेतले आहे.