नाशिक : झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या, बेड्सची कमतरता आणि ऑक्सिजनचा तुटवडा यामुळे कोरोना रुग्णांसाठी मागील महिना काळ ठरला होता. चारही बाजूंनी संकट ओढावलेल्या या काळात हतबल आणि निराश झालेल्यांना आपल्या जवळच्या व्यक्तीला गमवावे लागले होते. महिन्याभरानंतर आता परिस्थिती बदलली असून, ऑक्सिजनची मागणी ७५ मेट्रिक टनाने कमी झाली असून, आता दिवसाला केवळ ६० मेट्रिक टन इतक्या ऑक्सिजनची गरज आहे.
नाशिककरांसाठी मागील महिन्याचा काळ अत्यंत कठीण होता. ॲक्टिव्ह रुग्णसंख्येत नाशिक देशात प्रथम क्रमांकावर आल्याने यंत्रणेपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेची धावपळ झाली तर सर्वसामान्य नागरिकांना ऑक्सिजन मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागली. मागील महिन्यात रुग्णसंख्या वाढल्यामुळे जिल्ह्याची ऑक्सिजन गरज दिवसाला १३५ मेट्रिक टनावर पोहोचली होती. रुग्णालयांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्णांना दाखल करून घेण्यातही जोखीम होती, शिवाय उपचारार्थ दाखल रुग्णांच्या जीविताचा धोका निर्माण झाला होता. या कठीण प्रसंगातून जिल्ह्याची सुटका झाली असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे.
आजच्या परिस्थितीत जिल्ह्याला ६० मेट्रिक टन इतक्याच ऑक्सिजनची गरज असून, मागील महिन्याच्या तुलनेत ७५ मेट्रिक टनाने ऑक्सिजनची मागणी घटली आहे. जिल्ह्यात बारा दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर रुग्णसंख्या कमी होण्यास मोठी मदत झाली. राज्याचे निर्बंध अजूनही लागू असून, विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करीत असल्याने रस्त्यावरील गर्दी कमी होत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम झाला आणि रुग्णसंख्या कमी झाली. त्यामुळे ऑक्सिजनचीदेखील मागणी कमी झाली आहे.
--इन्फो--
रुग्णसंख्या कमी होत असल्याने जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटीचा दरही दहा टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांना ६० मेट्रिक टन इतकाच ऑक्सिजन लागत आहे, तर सध्या ८० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होत असून, २० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. कोरोना रुग्णांचा आलेख घटत असल्याने जिल्ह्यातील ऑक्सिजनची मागणी आणखी कमी होण्याची शक्यता आहे.