नांदगाव : ६८ वर्षे जुने असलेले शासकीय अनुदान प्राप्त अध्यापक विद्यालय (डी.एड.) नजीकच्या काळात दिंडोरी किंवा नाशिक येथे हलविण्याची तयारी सुरू असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी एकेकाळी येथील अध्यापक विद्यालय नावाजलेले होते. अलीकडच्या काळात शिक्षणक्षेत्रातील नोकºयांना ओहोटी लागल्याने डी.एड.ची मागणी काही प्रमाणात कमी झाली. अनेक वर्षे शिक्षणसेवकाच्या तुटपुंज्या मानधनावर काम करूनही अद्याप कायमस्वरूपी न झाल्याने डी.एड. व बी.एड.कडचा ओढा कमी झाला आहे.नांदगाव अध्यापक विद्यालयाला ६० विद्यार्थी घेण्याची मान्यता आहे. मात्र २०१५ मध्ये १५, २०१६ मध्ये ५९ व २०१७ मध्ये फक्त ४५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. २०१५मधील कमी प्रवेशसंख्येमुळे संबंधित संस्थेने तातडीने ठराव करून अध्यापक विद्यालय नांदगाव येथून हलविण्याचा निर्णय त्याच वर्षी घेतला. त्याची परवानगी भोपाळस्थित एनसीटीईकडे (नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन) प्रलंबित असून, ती अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती मविप्रचे शिक्षणाधिकारी शिंदे यांनी दिली. दिंडोरी येथे मविप्रचे विनाअनुदानित तत्त्वावर अध्यापक विद्यालय सुरू आहे. त्याठिकाणी माफक दरात शासकीय होस्टेल उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा राहण्याचा खर्च कमी होतो, असेही कारण नियोजित स्थलांतरामागे दिले जाते. नाशिकचे डी.एड. अनुदानित असल्याने तिथला फीचा खर्च कमी आहे. मात्र दोन्ही ठिकाणचे फायदे व तोटे वेगवेगळे आहेत. त्याचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. स्थलांतर थांबविण्याची मागणी विद्यार्थी कमी आहेत हे काही अंशी सत्य असले तरी नजीकच्या काळात शिक्षकांच्या भरतीसंदर्भात शासनाचे धोरण बदलले व नव्या संधी निर्माण झाल्या तर पुन: येथील अध्यापक विद्यालयाचा सुवर्णकाळ येऊ शकतो. सध्या अभियांत्रिकी महाविद्यालये ओस पडत आहेत तर फार्मसीला चांगले दिवस आले आहेत. म्हणूनच जुन्या व नांदगावच्या शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या या विद्यालयाचे स्थलांतर संस्थेने आवश्यक उपाययोजना करून थांबवावे, अशी मागणी समाजातील सर्व स्तरांमधून पुढे येत आहे.