पंचवटी : शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी असल्याने त्यातच थंडी पडत असल्याने शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम जाणवला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या फळभाज्यांची आवक घटल्याने गेल्या आठवड्यापासून फळभाज्या तेजीत आल्या आहे. एरव्ही १० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होणारे गावठी वांगे आता ४० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत असल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे. बाजार समितीत वांगी, कारले, काकडी, टमाटा तसेच भोपळा आदींसह अन्य फळभाज्या विक्रीसाठी दाखल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत असल्याने तसेच काही भागात थंडी पसरत असल्याने वातावरणाचा फटका फळभाज्यांच्या उत्पादनावर जाणवण्यास सुरुवात झाली आहे. वातावरणामुळे फळभाज्यांची आवक काही प्रमाणात घटलेली आहे. फळभाज्यात सध्या भोपळा वगळता सर्वच फळभाज्यांचे दर तेजीत आले आहे. गणेशोत्सव तसेच नवरात्र कालावधीत ७० ते ८० रुपये प्रति जाळी दराने विक्री होणाºया कारले जाळीला गेल्या आठवड्यापासून २५० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे तर दोडके ३००, काकडी ३०० रुपये दराने विक्री होत आहे. भोपळ्याला कमीत कमी ५ रुपये प्रति नग तर टमाटा १० रुपयाला दोन किलो असा बाजारभाव शेतकºयांना मिळत आहे. आगामी कालावधीत शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडल्यास फळभाज्यांचे दर आणखीनच तेजीत येण्याची शक्यता आहे. एकीकडे पालेभाज्यांची आवक घटल्यानंतरही बाजारभाव घसरले आहेत तर दुसरीकडे मात्र फळभाज्यांची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत.
फळभाज्या आवक घटली, बाजारभाव तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:24 AM